News Flash

नवा डाव मांडताना..

पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव. आठ-दहा वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं असल्याचं ऐकलं होतं.

उतारवयातील पुनर्विवाहांची संख्या आजकाल वाढली आहे. मात्र ते केल्यामुळे वाटय़ाला वैफल्य आणि असमाधान आलं तर तो घाव पचविणं फार अवघड असतं. त्यामुळे कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन न घेता व्यवहाराच्या निकषावर पडताळून पाहण्यासाठी आपली मुलं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी तसेच होणाऱ्या जोडीदाराशीही मोकळेपणाने चर्चा करायला हवी..

अनेक वर्षांनी नीता मला माथेरानला भेटली. तिला मी एकदम ओळखलं नाही. कापलेले केस. पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव. आठ-दहा वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं असल्याचं ऐकलं होतं. तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीशी ओळख करून देताना ती जरा अडखळली. त्यावर ते गृहस्थ पटकन म्हणाले, ‘‘मी मिस्टर नीता.’’ यावर साठी उलटलेली नीता चक्क लाजली. सहा वर्षांपूर्वी ती त्यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. बोलण्याच्या ओघात तिच्या लग्नाची हकिगत तिनं आपणहून सांगितली. तिचे आताचे पती तिच्या जावयाच्या नात्यातले. तिच्या मुलीनं आणि जावयानं त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. दोघंही एकमेकांच्या सहवासात आनंदी असल्याचं त्यांच्या देहबोलीवरून कळत होतं.

माझ्या दूरच्या परिचयातले प्रभाकर एकदा वेळ घेऊन मला भेटायला आले. जुजबी बोलणं झाल्यावर खासगी आवाजात म्हणाले, ‘‘मला जरा तुमचा सल्ला हवा आहे. माझी बायको जाऊन पंचवीस र्वष झाली. तिच्या मागे मुलांबाबतची सर्व कर्तव्ये मी पार पाडली. आता मी सत्तर वर्षांचा आहे. मला कळत नाहीये की मी आता दुसरं लग्न करावं की वृद्धाश्रमात राहायला जावं?’’ त्यांचा प्रश्न ऐकून मी गोंधळले. पण उत्तराची वाट न पाहता ते बोलत राहिले. ‘‘आज मी बिनकामाचा माणूस म्हणून जगतोय. घरात मुलगा-सून आहेत, पण प्रत्येक जण आपापल्या कामात. दिवसच्या दिवस मी रिकामा बसलेला असतो. एक-दोन दिवसांनी मुलगा विचारतो, ‘‘बाबा कसे आहात?’’ मी म्हणतो, ‘‘ठीक आहे.’’ बस! या पलीकडे माझ्याशी काही बोलायला कुणाला वेळ नसतो. पूर्वी एवढं जाणवलं नव्हतं पण आता वाटतं घरात आपल्या वयाचं, हक्काचं माणूस हवं. पण असा विषय काढायला संकोच वाटतो. कधी कधी वाटतं उठावं आणि वृद्धाश्रमात जाऊन राहावं. तिथं कदाचित बरोबरीच्या वयाच्या माणसांची सोबत मिळेल. कळत नाही काय करावं ते?’’

या वयात लग्न करावं असं वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे जोडीदार नसल्यामुळे जाणवणारी एकाकीपणाची भावना. खूप वेळा या भावनेला कारुण्याची झालर असते. मुलंबाळं करिअरच्या मागे असतात किंवा आपापल्या संसारात रमलेली असतात. आजारपण वा अन्य कोणती अडचण आली तर ती धावून येणार याची खात्री असते, परंतु त्यांच्या व्यग्र दिनक्रमामुळे आई किंवा वडिलांची रोजच्या रोज दखल घेण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे जोडीदाराची उणीव प्रकर्षांनं भासते. प्रौढ वयात पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची ही सर्व साधारण मानसिकता. त्याविषयी अधिक काही जाणून घेण्यासाठी ज्याचं वधूवरसूचक मंडळ आहे अशा राजेंद्र भवाळकर आणि सुचित्रा कुलकर्णी यांची मुद्दाम भेट घेतली असता अलीकडच्या काही वर्षांत विवाहोत्सुक प्रौढ व्यक्तींची संख्या नजरेत भरेल एवढी वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये पुरुषांची यादी प्रौढ स्त्रियांच्या यादीपेक्षा नेहमीच मोठी असल्याचा त्यांचा अनुभव आहे. याचे कारण म्हणजे स्त्रीला पुनर्विवाह करण्याची इच्छा असली तरी संस्कार आणि संकोच यामुळे विवाह मंडळामध्ये जाऊन स्वत:चे नाव नोंदविण्याची तिची मानसिकता नसते. जोपर्यंत मुलंबाळं, बहीण-भाऊ  वा मित्रमैत्रिणी तिच्या लग्नासाठी पुढाकार घेत नाहीत तोवर आपणहून आपले नाव नोंदविणाऱ्या स्त्रिया खूप कमी आहेत. याचं अजून एक कारण म्हणजे एकटेपणाची पोकळी स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी जाणवते. मुलाबाळांचे संसार, नात्यागोत्यातील समारंभ यामध्ये त्या रमू शकतात. ज्या स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा संपन्न असतात त्या आपापले छंद जोपासू शकतात. मैत्रिणींबरोबर चित्रपट, सहली वगैरेचा आनंद लुटू शकतात. हे सगळं करताना जोडीदाराची उणीव जाणवत असली तरी ती दूर करण्यासाठी लग्नाचा पर्याय व्यवहार्य ठरेल की नाही याबद्दल त्यांच्या मनात धास्ती असते. कारण लग्न कोणत्याही वयात केलं तरी पत्नीची पारंपरिक भूमिका तिनं स्वीकारली पाहिजे अशी सर्वाची अपेक्षा असते. तिनं स्वयंपाकघर ताब्यात घ्यावं, आल्यागेल्याचं पाहावं, सेवाशुश्रूषा करावी अशी अपेक्षा कमी-अधिक प्रमाणात बहुसंख्य पुरुषांची असते. स्त्रीला मात्र या वयात नव्या घरातील चालीरीती, स्वयंपाकाच्या पद्धती शिकून घेण्यात फारसं स्वारस्य उरलेलं नसतं. आयुष्याच्या उतरार्धात हे बदल करण्यापेक्षा लग्न नको असं स्त्रियांना वाटतं. बहुसंख्य पुरुष मात्र मुलाबाळांच्या संसारात फारसे रस घेऊ  शकत नाहीत. सर्वाच्या दृष्टीने आपण कमी महत्त्वाचे आहोत, घरात आपल्याला स्थान नाही, एवढंच नाही तर आपण म्हणजे घरातील अडगळ आहोत असा गंड त्यांच्या मनात निर्माण होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना जोडीदाराची सोबत आवश्यक वाटते.

पुनर्विवाहासाठी उत्सुक असलेल्या स्त्री-पुरुषांच्या संख्येत जरी तफावत असली तरी एकदा लग्न करायचा निर्णय घेतल्यावर मात्र तो यशस्वी होण्यासाठी दोघांनाही अनेक अंगांनी विचार करावा लागतो. पहिल्या लग्नात जसा समजूतदारपणा दाखवला असतो, एकमेकांमध्ये विश्वास आणि प्रेमाचं नातं रुजण्यासाठी जसे जाणीवपूर्वक प्रयत्न केले असतात तसेच किंबहुना अधिक प्रयत्न या वयात करण्याची आवश्यकता असते. कारण वयोपरत्वे आपल्या मतांना ठामपणा आला असतो. अनुभवाचं भलंमोठं गाठोडं जमा झालं असतं. आपली इच्छा असो वा नसो त्याचं ओझं आपण वाहत असतो. त्यामुळे कोणत्याही बदलाला सामोरी जायची लवचीकता कमी झालेली असते. नव्या जोडीदाराबरोबर नवा डाव मांडताना दोघांची भावनिक अवस्था समजून घेण्याची जशी जरूर असते तशीच काही व्यावहारिक बाबींबद्दल खुला दृष्टिकोन ठेवण्याची. दोघांची स्थावरजंगम मालमत्ता, आजारपणाची शक्यता, भविष्याची तजवीज याबाबत मुलांना

अनिलराव आणि शलाकानं लग्न केलं तेव्हा दोघांची मुलं आपापल्या विश्वात रमली होती. शलाकानं लग्न झाल्यावर थोडय़ाच दिवसांत घराचा चेहरामोहरा बदलून टाकला. वर्ष-सहा महिन्यांत अनिलरावांच्या पहिल्या बायकोचे दागिने मोडून तिला हवे तसे घडवले. त्यामुळे अनिलरावांच्या मुली दुखावल्या गेल्या. त्यांनी मुलींना पैसे देऊ  केले; परंतु मुलींच्या भावना पैशात नाही तर आपल्या आईच्या दागिन्यांमध्ये गुंतल्या होत्या हे ते ओळखू शकले नाहीत. त्यामुळे मुली वडिलांना दुरावल्या. झाल्या प्रकाराबद्दल अनिलरावांनी शलाकाला दोष दिला. आज दोघं विभक्त झाले नसले तरी त्यांच्यातील सुसंवाद हरवला आहे. तसंच अनुराधानंही संजयशी पुनर्विवाह केल्यावर त्यांच्या दोन्ही मुलींना आपलं मानून त्यांच्या लग्नात पुढाकार घेतला. त्यांच्या बाळंतपणाची जबाबदारी उचलली; परंतु तिच्या मुलाला नोकरीत काही अडचणी आल्यामुळे नैराश्य आलं. मानसोपचार घ्यावे लागले. तेव्हा मात्र संजयनं तिला साथ दिली नाही. अनुराधाबरोबर तिच्या मुलाच्या गावी जाऊन राहायला सपशेल नकार दिला. आज अनुराधा आणि संजय वेगवेगळ्या गावांत राहतात.

या वयात केलेल्या पुनर्विवाहामुळे जर वाटय़ाला वैफल्य आणि असमाधान आलं तर तो घाव पचविणं फार अवघड असतं. कारण वयोपरत्वे शरीरमनाची ताकद कमी झाली असते. त्यामुळे कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन न घेता व्यवहाराच्या निकषावर पडताळून पाहण्यासाठी आपली मुलं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी मोकळेपणी चर्चा करायची गरज असते. नीता आणि तिच्या पतीबाबत या साऱ्या गोष्टी सहजगत्या घडून आल्या. त्यामुळे उर्वरित आयुष्याचा आनंद ते एकमेकांसोबत उपभोगू शकत आहेत.

प्रभाकर यांनाही समवयस्क व्यक्तीच्या सोबतीची गरज जाणवत आहे, पण काय पर्याय निवडावा याबाबत मनात गोंधळ उडाला आहे आणि तो साहजिकही आहे. लग्न आणि वृद्धाश्रम हे दोन्हीही अगदी स्वतंत्र पर्याय आहेत. त्यातील कोणता पर्याय आपल्या स्वभावधर्माला अधिक रुचणार आहे हे समजून घेण्यासाठी जशी आत्मपरीक्षणाची गरज आहे तशीच घरातल्यांपर्यंत आपली एकाकीपणाची वेदना पोहोचविण्याचीही. त्यासाठी समुपदेशक वा जवळच्या व्यक्ती मदत करू शकतात.

आज एकंदरच समाजात प्रौढांच्या पुनर्विवाहाबद्दल खुला दृष्टिकोन रुजत चालला आहे. विवाहमंडळात जाऊन नाव नोंदविणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या सोबत अनेक वेळा त्यांची मुलं, सुनाजावई, मित्रमैत्रिणी, एवढंच नाही तर क्वचित कधी व्याहीविहीण येत असल्याचे अनुभव ऐकायला मिळाले. आवश्यकता आहे ती फक्त सारासार विचार करून जपून पाऊल उचलण्याची.

-मृणालिनी चितळे

chitale.mrinalini@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2016 1:10 am

Web Title: new marriage life
Next Stories
1 भांडा सौख्यभरे
2 हाती फक्त हात हवेत..
3 लग्न म्हणजे धर्म, अर्थ आणि ‘काम’ही ..
Just Now!
X