जेव्हा मुलं आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत; विशेषत: त्या अपेक्षांविषयी मतभेद असतात त्या घरात नवरा-बायकोमधले वाद अपरिहार्य असतात. याचा दूरगामी परिणाम पतीपत्नींमधील नात्यावर होत असतो. अशावेळी कवी अनिल यांचे हे शब्द महत्त्वाचे ठरतात.
कसे निभावून गेलो
कळत नाही कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते
नुसते हाती हात होते

अमितची स्कूटर पार्किंगमध्ये पाहून राजनचा जीव धसकला. घरात पाऊल टाकताच त्यानं मीनाला विचारलं, ‘‘अमित आलाय?’’
तिनं काहीच उत्तर दिलं नाही. ‘‘आत्ता हा घरी कसा?’’ राजनचा आवाज चढला.
‘‘मी विचारलं नाही.’’
‘‘विचारलं नाही का मला सांगायचं नाही? अमित..’’ त्यानं मोठय़ांदा हाक मारली.
‘‘त्याच्याशी भांडू नकोस. नीट बोल.’’
‘‘त्याच्याशी कसं बोलायचं ते तू मला शिकवू नकोस. अमित..’’
‘‘तो झोपलाय. चार दिवसांपूर्वी नोकरी सोडली म्हणून घरी आहे. तुला सांगायला घाबरत होता.’’
‘‘नोकरी सोडली? कितवी नोकरी आहे ही? आणि तू त्याला पाठीशी घालतीएस? तुझ्या लाडानं त्याचं वाटोळं झालं आहे.’’
‘‘माझ्या लाडानं नाही तर तुझ्या धाकानं. वाट्टेल तसा त्याला बोलत असतोस. अनिश आणि त्याच्यात तर कायम भेदभाव करत आला आहेस.’’
‘‘का नाही करणार? वयाच्या तेविसाव्या वर्षी इंजिनीअर होऊन अनिश कमवायला लागला आणि हा दिवटा वयाची तिशी ओलांडली तरी एक नोकरी टिकवू शकत नाही. लाज वाटते मला याची.’’
ज्या घरातील मुलं आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत; विशेषत: त्या अपेक्षांविषयी दोघांमध्ये मतभेद असतात त्या घरात घडणाऱ्या वादाचे हे प्रातिनिधिक उदाहरण. फक्त मुलांचं शिक्षण आणि नोकरी याबद्दल आई-वडिलांच्या अपेक्षा अनेक वेळा परस्परपूरक नसतात असं नाही तर मुलं वाढविताना त्यांचे लाड किती करायचे आणि शिस्त कशी लावायची याबद्दलही पती-पत्नींमध्ये एकवाक्यता नसते. त्यातूनही मुलं यशस्वी झाली तर त्यामध्ये आमचा वाटा नाही हे सांगताना आई-वडिलांचा अहं सुखावत असतो पण अपेक्षित यश आणि स्थैर्य जर मूल मिळवू शकलं नाही तर त्याला जबाबदार आम्ही नाही असं म्हणून आई-वडिलांना आपली जबाबदारी झटकता येत नाही. याचा अपरिहार्य परिणाम पती-पत्नींमधील नात्यावर होत असतो.
अनेक वेळा यशापयश मोजायच्या आपल्या आणि मुलांच्या फूटपट्टय़ा वेगळ्या असतात याचं भान प्रौढ पिढीला राहात नाही आणि मग वैचारिक आणि भावनिक गोंधळामुळे पती-पत्नीमधील नातं गढूळ होऊन जातं. नात्यामध्ये असह्य़ ताण निर्माण होतो. राजन-मीनाबाबत असंच झालं होतं. अमितला लहानपणापासून खेळामध्ये विशेष रस होता. गडकिल्ले भटकण्याची आवड होती. हिमालयात ट्रेकिंगला जाऊन आल्यावर मोठेपणी आपणही एक संस्था काढावी आणि साहस सहली आयोजित कराव्यात, तोच आपला व्यवसाय असावा अशी त्याची इच्छा होती तर राजनचा आग्रह होता की त्यानं आधी नोकरीत स्थिर व्हावं, पोटापाण्यापुरतं कमवावं आणि मग आपला छंदीफंदीपणा जोपासावा. मुलाची इच्छा आणि नवऱ्याचा अट्टहास यामध्ये मीनाची मात्र फरफट होत होती. कोण बरोबर कोण चूक हे ठरवताना खलिल जिब्रान या तत्ववेत्त्याचं एक वाक्य तिच्या मनात घर करून होतं. ‘अपत्य’ या विषयावर त्यानं लिहिलं आहे; ‘तुमची मुलं ही तुमच्या माध्यमातून जन्मली असली तरी ती तुमची नसतात. तुम्ही तुमच्या मुलांना तुमचं प्रेम देऊ शकाल, परंतु तुमचे विचार देऊ शकणार नाही, कारण त्यांचे स्वत:चे स्वतंत्र विचार असतील. तुम्ही त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा पण त्यांना तुमच्यासारखं करण्याचा प्रयत्न करू नका. जीवनाचा प्रवाह हा कधी मागे वळत नसतो.’ हे विधान तिला पटलं असलं तरी ते राजनपर्यंत पोचविता येत नव्हतं आणि अमितरूपानं त्यांच्या आयुष्याला पडलेला तिढा सोडवता येत नव्हता. दिवसेंदिवस तिची अगतिकता वाढत चालली होती.
राजन-मीनाप्रमाणे रमा आणि अरविंदमध्ये त्यांच्या रोहितला वाढविताना मतभेद झाले नव्हते. तो पहिल्या श्रेणीत येणारा नाही पण नापासही होणार नाही हे समजून घेऊन त्यांनी त्याच्याकडून कधी अवास्तव अपेक्षा केल्या नव्हत्या. तरीही आज त्याच्याबाबत ते अगतिक झाले आहेत ते त्याच्या दारूच्या आहारी जाण्यामुळे. आतापर्यंत तीन वेळा व्यसनमुक्ती केंद्रात जाऊनही रोहित त्यामधून बाहेर पडू शकलेला नाही. तो कधी घरात राहतो कधी नाही. मित्राकडे जातो असं सांगून बाहेर पडतो तेव्हा त्याचा आठ-आठ दिवस पत्ता नसतो. त्याच्या वागण्याविषयी अरविंद आणि रमा एकमेकांना दोष देत नसले तरी त्याच्या काळजीमुळे ते सैरभैर होऊन जातात. त्याच्यापायी दोघांचं आयुष्य बिच्चारं होऊन गेलं आहे. आजकाल रमानं स्वत:ला व्रतवैकल्यामध्ये बुडवून घेतलं आहे. अनेक जणांना ती रोहितची पत्रिका दाखवत असते. अरविंदला हे सगळं थोतांड वाटतं. रात्ररात्र तो झोपेविना तळमळत असतो. आज एका घरात राहात असूनही दोघांची तोंडं दोन दिशांना असतात. बऱ्याच दिवसांनी मी त्यांना भेटायला गेले. बाहेरच्या खोलीत अरविंद सात-आठ प्रकारच्या गोळ्या मांडून बसला होता. ‘‘कोणतं औषध कधी घ्यायचं ते लिहून ठेवतोय.’’ मला बघून तो म्हणाला. रमा आतल्या खोलीत होती. समोर ज्ञानेश्वरी होती. मला पाहून ती म्हणाली, ‘‘बैस. तेराव्या अध्यायातील ही ओवी बघ. त्यामध्ये ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की, ‘झाडाखाली सावलीसाठी बसलेल्या गाईगुरांविषयी झाडाला जेवढी आस्था असते तेवढी आस्था आपल्याला आपल्या मुलाबाळांबद्दल वाटायला हवी. उन्हं उतरल्यावर गुरं उठून गेली म्हणून झाड कधी हळहळत नाही नि काळजीही करत नाही. म्हणजे जी गोष्ट बाराव्या शतकात एका सोळा वर्षांच्या मुलाला जाणवली, ज्यानं स्वत: घरसंसार याचा अनुभव घेतला नव्हता त्याला कळली. आम्ही मात्र दिवसरात्र मुलाच्या विवंचनेत गुंतून पडलो आहोत. तेच ते दु:ख उगाळत राहिलो आहोत. कधी संपणार हे सगळं..? खरं सांगू का, रोहितचं असं हे रोजचं मरण पाहण्यापेक्षा तो मेला तर बरं होईल. त्याचं श्राद्ध घालून आम्हाला मोकळं तरी होता येईल.’’ असं म्हणून ती पुन:पुन्हा त्याच्याविषयी बोलत राहिली. अरविंद आत आला तरी ती थांबायला तयार नव्हती. त्याच्या कपाळावरच्या आठय़ांमध्ये भर पडत गेली. ‘‘तुझं ते नेहमीचं पुराण बंद कर आता.’’ तो तिच्यावर खेकसला. थोडं फार इकडचं-तिकडचं बोलून मी जायला उठले. समोरच्या भिंतीवर अरविंद, रमा आणि रोहितचा हसतानाचा फोटो टांगलेला होता. त्याकडे पाहायचं मी टाळलं.
रस्त्यावर पोचले आणि का कुणास ठाऊक कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे आठवले. दोघंही बुद्धिमान. संवेदनशील. सर्वाचा विरोध पत्करून १९२९ मध्ये त्यांनी केलेला प्रेमविवाह. साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करत यशोशिखरावर असताना त्यांच्या वाटय़ाला आलेले तरण्याताठय़ा मुलाच्या मृत्यूचे दु:ख. त्यानंतर अनिल यांनी लिहिलेल्या कवितेतील याओळी.
डाव असे पडत होते की सारा खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते जीव पुरा विटून जावा
कसे निभावून गेलो कळत नाही कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते नुसते हाती हात होते
एवढं मोठं दु:ख सोसताना परस्परांची सोबत असल्याची जाणीव वेदनेचा भार कसा हलका करते, करू शकते याचं हे उदाहरण. असं नातं कसं रुजतं? कशामुळे फुलतं? प्रयत्नपूर्वक ते रुजवता नि फुलवता येतं की ते आतून उमलून यावं लागतं? या प्रश्नांची नेमकी उत्तरं देणं खूप अवघड आहे. सगळ्या प्रश्नांना उत्तरं असतातच असं नाही. नातेसंबंधातील प्रश्न तर दोन अधिक दोन बरोबर चार अशा पद्धतीनं नाही सुटत. प्रत्येकाला आपलं गणित आपल्या पद्धतीनं सोडवायला लागतं. अशा वेळी ‘हातात हात आहे’ या आधाराने डोंगराएवढय़ा दु:खाचा सामना करणारी माणसं मनावर फुंकर घालत राहतात एवढं नक्की.
chitale.mrinalini@gmail.com

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!