24 October 2020

News Flash

कालिंदी

कालिंदी, अप्पासाहेब डग्गे या सुधारणावादी वकिलाची मुलगी आहे. ती बी.ए.च्या वर्गात शिकते आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘ब्राह्मणकन्या’ (१९३०) या कादंबरीची नायिका कालिंदी हिला ग. त्र्यं. माडखोलकरांनी त्या काळी ‘उन्मार्गगामी’ असे दूषण दिले आहे. पण तिच्या मनात चाललेली आंदोलने पाहता, ती उच्छृंखल, स्वार्थी, कुळाला बट्टा लावणारी, स्वैरतेत आनंद मानणारी, विषयसुखाला लालचावलेली अशी वाटत नाही. त्या काळातल्या नीतिअनीतीच्या कल्पनांमुळे समाजाच्या टीकेचा विषय झालेली, पण तरीही निग्रहाने स्वत:च्या विवेकावर विसंबून राहिलेली कालिंदी आजच्या काळातही सुसंगत आणि महत्त्वाची वाटते.

डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ‘ब्राह्मणकन्या’ (१९३०) या कादंबरीची नायिका कालिंदी ही केतकरांची मानसकन्या आहे. स्त्रीने जसे असायला हवे, असे या समाजशास्त्रज्ञ लेखकाला वाटत होते तशी त्याने ही ‘कालिंदी’ उभी केली आहे.

कालिंदी, अप्पासाहेब डग्गे या सुधारणावादी वकिलाची मुलगी आहे. ती बी.ए.च्या वर्गात शिकते आहे. तिचे लग्नाचे वय झाले आहे. वडिलांना वाटत होते, मी ज्याप्रमाणे प्रत्यक्ष रखेलीच्या मुलीशी लग्न केले त्याप्रमाणे माझ्या मुलीचे रूप आणि गुण पाहून कोणीतरी तरुण तिच्याशी लग्न करायला पुढे येईलच. पण तसे झाले नाही. कालिंदीला मागणी घालणारे पत्र एका सुशिक्षित आणि हुशार तरुणाकडून आले, पण तो नायकीणीचा मुलगा होता. कालिंदीची आई शांताबाई ही मंजुळा नावाच्या रखेलीची मुलगी होती. त्या ‘कुलहीन’ स्त्रीशी लग्न करण्यात त्यांचा हेतू ‘जातिभेद मोडण्याचा’, ‘ब्राह्मण जातीला उदार बनविण्याचा’ आणि ‘समाजात सुधारणा करण्याचा’ होता. ‘आपण शांताबाईशी लग्न केले ते आपले कुटुंब नायकिणीच्या वर्गात ढकलण्यासाठी केले नाही, तर नायकीण वर्गातील मुलीस चांगल्या वर्गातदेखील जाता येणे शक्य आहे हे सिद्ध करण्यासाठी, पतितांस नवी आशा उत्पन्न करण्यासाठी केले’ असे आप्पासाहेबांनी पुन्हा बजावताच कालिंदी म्हणते, ‘तुमच्या औदार्याने तुमची नुकसानी काय झाली? तर श्राद्धाकरता भिक्षुक आले नाहीत अशा प्रकारची ना? तुम्हाला स्वत:ला कमीपणा आला नाही. तुम्ही अजून ब्राह्मणच आहात पण आम्ही कोठे ब्राह्मण आहोत?’

लग्नाच्या संदर्भात कालिंदीसमोर निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर तिने स्वत:च शोधून काढले, तिने कॉलेज सोडले, घर सोडले, आणि शिवशरण अप्पा नावाच्या लिंगायत, तंबाखूची वखार असणाऱ्या व्यापाऱ्याची रखेली होऊन राहणे तिने पत्करले. शिवशरण अप्पा तिच्या आई-वडिलांच्या परिचयाचा होता, पण त्याची रखेली म्हणून राहण्याचा तिचा हा निर्णय समाजाला धक्का देणारा आणि वडिलांना संताप आणणारा होता. अप्पासाहेब डग्गे यांना तिचा राग आला तो तिने स्वत:चे अकल्याण केले म्हणून आला नाही तर तिने आपली अपकीर्ती केली म्हणून आला. कालिंदीचा धाकटा भाऊ सत्यव्रत याच्याशी कालिंदी नेहमी चर्चा करीत असे. त्याला आपल्या बहिणीबद्दल आदर होता. ती प्रामाणिक, इतरांच्या दोषांकडे दयाद्र्रि दृष्टीने पाहणारी आहे असे त्याचे मत होते. पण कालिंदीचे हे कृत्य अविचारीपणाचे आहे, असा वेडेपणा तिच्याकडून झाला तरी कसा असा प्रश्न त्याला पडला. एकदा तिची भेट झाल्यावर त्याने तसे तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘मी ती नीतिभ्रष्ट असेन पण अविचारी नाही.’ आपल्या भवितव्याबद्दल तिने खूप विचार केला आहे. ‘ज्या जातीला सर्वच जाती तुच्छ समजतात त्या जातीकडेच आपल्याला वळणे भाग आहे’ ती म्हणते, ‘जातिभेद मोडावा असे म्हणणे फॅशनेबल झाले आहे. तो मोडावा म्हणून सात्त्विक वा तात्त्विक, इच्छा व्यक्त करणारा वर्ग अस्तित्वात आहे पण इच्छिणारा वर्ग नाही.’ सडेतोडपणा, स्पष्टवक्तेपण हा तिचा स्वभाव आहे- ‘कायदेशीर लग्नाचा हेतू, मुलांना पैसे मिळावे, आपल्याला अन्नवस्त्र मिळावे आणि मुलांना अधर्मसंतती कोणी समजू नये एवढाच आहे. मला होणारी मुले कोणीही कुलीन मानणार नाही, तर विवाहसंस्था माझ्याबाबतीत निरुपयोगीच ठरते. केवळ पैशांसाठी मी स्वत:ला विकणार नाही. मला अविचारी, उच्छृंखल म्हटले तरी चालेल. पण पैशांसाठी प्रेमसंबंध जोडला असे माझे वर्णन व्हायला नको.’ असे म्हणणारा.

कालिंदीला झालेला मुलगा पाहायला तिची आई जाते तेव्हा ती बरीच सुखात आहे, चैनीत जगते आहे असे शांताबाईला वाटते. ‘पुरुष ठेवलेल्या बाईची बडदास्त चांगली ठेवतात पण लग्नाची म्हणजे हक्काची बायको त्यांना कवडी मोल वाटते’ असा उद्गारही ती काढते. पण कालिंदी मनाने स्वस्थ नाही. आपण जे केले ते गैर झाले असे तिला वाटू लागले आहे. शिवशरणलाही तिचा हळूहळू कंटाळा येऊ लागला आहे. त्या दोघांमध्ये अंतर होतेच. मुख्य म्हणजे बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक होता. त्याच्या सुशिक्षिततेच्या मर्यादा कालिंदीला जाणवू लागल्या होत्या. कालिंदीला इतमामात ठेवण्यात येणारा खर्च त्याला झेपेना. ‘कालिंदी हे एक फारच महाग खेळणे आहे’ असे त्याला वाटू लागले. आणि ‘तो आपली योग्यता रममाण होण्यास उपयोगी स्त्री’ समजतो आहे, असे कालिंदीला वाटू लागले. ‘आपण पैशासाठी त्याला चिकटून आहोत. आपल्या मुलाला हक्काने काही मिळेल असे आपण काही केले नाही, दुसऱ्या एका बाईच्या सौख्यावर आपण कुऱ्हाड घालतो आहोत, आपला मुलगा आपल्याकडे उपरोधाने पाहतो आहे, तू माझे बरे केले नाहीस अशी निर्भर्त्सना करतो आहे..’ असे विचार तिच्या मनात येऊ लागले. आपल्या ‘रखेलीपणाची’ जाणीव तिला होऊ लागली. तिच्यासाठी राहायला घेतलेला बंगला त्याने भाडय़ाने दिला, तिला एका चाळीत नेऊन ठेवले, तिला दिलेले दागिने त्याने परत घेतले, त्याचे वागणे तुटक होऊ लागले. त्यांच्यात आलेल्या दूरत्वाची बातमी कळताच इतर माणसे तिच्याशी ओळख करून घेण्यासाठी येऊ लागली, त्यावरून शिवशरण अप्पा तिला दूषणे देऊ लागला. ज्याच्यासाठी आपण घरादारावर पाणी सोडले तो मनुष्य आपल्या प्रेमाला पात्र नाही, त्याला सोडावे असा विचार तिच्या मनात बळावू लागला.

त्या काळी ग. त्र्यं. माडखोलकरांनी कालिंदीला ‘उन्मार्गगामी’ असे दूषण दिले आहे. पण तिच्या मनात चाललेली आंदोलने पाहता, ती उच्छृंखल, स्वार्थी, कुळाला बट्टा लावणारी, स्वैरतेत आनंद मानणारी, विषयसुखाला लालचावलेली अशी वाटत नाही. तिने फक्त प्रस्थापित नीतिकल्पनांच्या विरुद्ध बंड केले होते, तिचा निर्णय तिच्या एका प्रेमभंगामुळे आणि समाजाने तिला तुच्छ ठरवल्यामुळे झालेला होता. ब्राह्मणेतर सुशिक्षित जातीतदेखील आपण मिसळून जाणार नाही या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले होते. आता ती पुन्हा निराश होते, आत्महत्येचे विचार तिच्या मनात येऊ लागतात. शिवशरणला सोडून ती मुलासह बाहेर पडते. ‘पुरुषापासून द्रव्य उपटणे किंवा त्याच्या पैशावर डामडौलाने राहणे’ हे तिचे ध्येय नव्हते. आत्महत्येचे विचार तिच्या मनात थैमान घालू लागतात. पण तिची मैत्रीण एसतेर तिला भेटते, सावरते, कालिंदीला मुंबईला नोकरी मिळते. रामराव धडफळे नावाच्या वकिलाचे तिला आकर्षण वाटू लागते पण ‘आपल्यासारखी डाग लागलेली स्त्री त्याची बायको व्हावयास नको’ असे तिला वाटते. पुढे आपले अािण आपल्या कुळाचे पूर्वचरित्र ती त्याला सांगते आणि ‘अविवाहित मातृत्वाची लज्जास्पदता काढून टाकण्याची इच्छा असणारा’, तिच्यावर प्रेम करणारा विचारी पुरुष तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवतो.

केतकरांनी ‘कालिंदी’ ही तरुणी अतिशय समरसून रंगविली आहे. तिची विचार करण्याची पद्धत, ‘लग्न’ या संस्थेसंबंधी तिने मांडलेली मते, तिच्या मनाची घालमेल, तिची सारासार विवेकबुद्धी, तिरीमिरीत घेतलेल्या एका निर्णयामुळे पाहता पाहता वर्ष-दीड वर्षांत कडेलोटाकडे गेलेले आयुष्य सावरण्यासाठी तिने केलेले प्रयत्न आणि तिची जिद्द, तिचा प्रेमळ स्वभाव एसतेर या बेनेइस्राईल जमातीच्या मैत्रिणीबद्दलची तिची कृतज्ञता आणि स्नेह, रामरावाबद्दल निर्माण होणारे आकर्षण वाहवत जाऊ न देण्यासाठी सुरू असलेली तिची धडपड असे अनेक पैलू तिच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात. त्या काळातल्या नीतिअनीतीच्या कल्पनांमुळे समाजाच्या टीकेचा विषय झालेली, पण तरीही निग्रहाने स्वत:च्या विवेकावर विसंबून राहिलेली कालिंदी मला आजच्या काळातही सुसंगत आणि महत्त्वाची वाटते.

कालिंदीची कथा आज पुन्हा वाचताना ‘लग्न आणि लग्नाशिवाय पुरुष सहवास ही सारखीच वाटून एखादी तरुण मुलगी लग्नाशिवाय पुरुष सहवास पत्करत असेल’ तर ती गोष्ट आक्षेपार्ह वाटण्याचे काही कारण नाही, हा प्रश्न उपस्थित करून केतकरांनी जवळजवळ पुढच्या शंभर वर्षांनी उद्भवू शकणारा पेच त्या काळात कल्पिला अािण त्यावर उत्तरेही शोधून पाहिली. स्त्रीने मिळवती होऊन स्वतंत्रपणे जगायला समर्थ झाले पाहिजे हे नि:संदिग्धपणे पटवून दिले. ‘जुन्या भावना आणि नवीन विचार यांच्या कचाटय़ात सापडलेली माणसे’ तर आजही सर्वत्र सापडतात. आर्थिक स्वातंत्र्याच्या जाणिवेने स्त्रीला कित्ती आत्मविश्वास येतो, ती किती निर्भर आणि उदार होते हे कालिंदीच्या रूपाने त्यांनी दाखवून दिले. आणि ‘लग्ने आईबापांच्या इच्छेने ठरवण्याऐवजी ज्यांची लग्ने व्हावयाची आहेत यांच्या इच्छेने ठरली पाहिजेत’ हा विचार आजच्या आई-वडिलांसाठी गेल्या शतकातच लिहून ठेवला.

प्रभा गणोरकर  prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 1:00 am

Web Title: article on dr shridhar venkatesh ketkar novel brahman kanya main character kalindi
Next Stories
1 दुर्गी
2 लेखकांचे मनस्वी स्त्रीचित्रण
Just Now!
X