संगणक आल्यामुळे कामाचा वेग झपाटय़ाने वाढला आहे. त्यामुळे संगणकाची मागणीही प्रचंड वाढली आहे. प्रत्येक सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये,शैक्षणिक संस्था संगणकीकृत झाली आहेत. यामध्ये दिवसेंदिवस विकासात्मक बदलही होत आहे. संगणक म्हटला की एक मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड, माऊस या गोष्टीं सोबत टेबल, खुर्ची ही सुद्धा आलीच. कार्यालयीन काम करताना असे लक्षात आले की या गोष्टींसाठी साधारण ८ ते १० फुटांची जागा लागते. ही जागा कमी करण्याचे प्रयत्न झाल्यावर १७ बाय १७ इंचाचा मॉनिटरचा आकार कमी करण्यात आला. आता लॅपटॉप, एलसीडी, एलईडी आदींनी त्याची जागा घेतली. मॉनिटरचा आकार बदलला पाठोपाठ सीपीयूनेही रुप परिवर्तन केले आहे. पूर्वी मॉनिटर सोबत सीपीयू येत असे. लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये मागच्या बाजूस सीपीयूची रचना करण्यात आली. पुढे त्यात आणखी बदल होत गेला आहे. एका सीपीयूला एकच मॉनिटर अशी जी आपली धारणा होती ती आता पूर्णपणे बदलली आहे. कारण सीपीयूची जागा आता एका वेगळ्या डिव्हाईसने घेतली आहे.
आज एका सीपीयूची किंमत नाही म्हणता १० ते १२ हजार रुपये आहे. परंतु त्या जागी हे डिव्हाईस वापरले गेले तर जवळजवळ सात ते आठ हजार रुपयांची बचत होते. ‘अ‍ॅक्सेस’ नावाचे हे डिव्हाईस आता बाजारात आले असून सीपीयूमधील हार्डडिक्सच्या आकाराइतके लहान असे हे डिव्हाईस आहे.
या मुळे असा फायदा झाला की, मॉनिटरसोबत सीपीयूसाठी लागणारी जागा ही आपोआप कमी झाली आणि सीपीयूच्या  जागेचा वापर इतर कामांसाठी होऊ लागला. सध्या आपण साधारण २ जीबी रॅम, ५०० जीबी हार्डडिक्स आदीं गोष्टी असलेले सीपीयू वापरतो. त्यासोबत एक मॉनिटर असतो. या नव्या डिव्हाइसचे वेगळेपण असे की, या एकाच सीपीयूवर आपण ५० ते १०० मॉनिटरची जोडणी करुन तेवढय़ाच व्यक्तींकडून काम करुन घेऊ शकतो.
 या अशा अनेक जोडणीसाठी अ‍ॅक्सेस डिव्हाईसची गरज भासते. एका डिव्हाईस सोबत एक मॉनिटर अशी साधारण रचना असते. एका सीपीयूला एक मॉनिटर जोडला की दुसरा मॉनिटर सुरू करण्यासाठी सीपीयूच्या जागी हे डिव्हाईस काम करते. या डिव्हाईसलाच जोडून तिसरे डिव्हाईस आणि मॉनिटर, त्याचप्रमाणे चौथा, पाचवा असे शंभर वा त्यापेक्षा तुम्हाला आवश्यक तेवढे मॉनिटर जोडून तुम्ही १०० वा त्यापेक्षा अधिक जणांकडून आपले वेगवेगळे काम करु शकता.
हे अ‍ॅक्सेस डिव्हाईस केलेल्या कामाचा डेटा सीपीयूपर्यंत नेण्याचे काम करीत असते. या सीपीयूच्या हार्डडिक्समध्ये तुम्ही केलेल्या कामाचा डेटा हा जमा आणि सुरक्षित होत असतो. या डिव्हाईसने तुमचा सहकारी काय काम करीत आहे याचीही माहिती मिळत असते. डिव्हाईसमध्ये ‘लॉक’ यंत्रणाही असून तुमचे गोपनीय काम पासवर्डमार्फत तुम्ही सुरक्षित ठेऊ शकता. जर त्याची जरुरी नसेल तर तुमची एखादी फाईल तुमचा एखादा सहकारी सहज उघडून पाहू शकण्याची सुविधाही यात आहे. या अ‍ॅक्सेस डिव्हाईसमध्ये यूएसबी कनेक्शनही दिले असून त्यामार्फत पेनड्राईव्हचा वापरही करु शकतो. म्हणजे तुम्ही केलेले काम तुमच्या पेनड्राईव्हमध्ये जमा करु शकता. त्याचप्रमाणे सीपीयूला जोडलेल्या एका राऊटरच्या मार्फत तुम्ही सर्व मॉनिटरवर इंटरनेटचा वापरही सहजरित्या करु शकता.
तुमचे काम कशाप्रकारचे, कामाचा व्याप किती मोठय़ा प्रमाणात आहे. त्यासाठी किती मॉनिटरची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने या डिव्हाईसची रचना केलेली असते. विविध कार्यालयाच्या एका विभागात १०, २० ३०, ५० वा त्यापेक्षा जास्त मॉनिटर लागणार असतील तर या डिव्हाईसचा चांगला उपयोग होतो. वर्ड, एक्स्सेलचे काम असो, फोटो, व्हिडिओ एडिटींग किंवा अ‍ॅनिमेशनचे काम असो, प्रत्येक कामाच्या क्षमतेनुसार लागणारे डिव्हाईस तयार केले जातात व ते वापरले जातात. त्याच्या किंमतीही क्षमतेनुसार ठरल्या आहेत. फक्त एकच सीपीयू कामाच्या क्षमतेनुसार घेणे आवश्यक आहे. बाकी कामाचा वेग वाढविण्याचे काम हे अ‍ॅक्सेस डिव्हाईस करते.
डेस्कस्टॉप कॉम्प्युटरला साधारणपणे १२० ते १५० वॉटची ऊर्जा लागते. परंतु या अ‍ॅक्सेस डिव्हाईस प्रणालीत केवळ १ वॉटचीच ऊर्जा खर्च होते.  एकंदरीत विजेची मोठय़ाप्रमाणात बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण होण्यासही यामुळे मदत झाली. ग्रीन कॉम्प्युटरच्या युगात या प्रणालीलाही एक अनन्य साधारण महत्व आहे. ई कॉम्प्युटर कंपनीने या डिव्हाईसची निर्मिती केली असून त्याचा वापर देशातील अनेक राज्यात सरकारी, निमसरकारी, खाजगी उद्योग क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठय़ाप्रमाणावर सुरू आहे. या कंपनीच्या सेवेचा १४० देशांत सुमारे ४ दशलक्ष लोक लाभ घेत आहेत. भारतात आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार, आसाम, पंजाब, हरियाणा आदी राज्यांत त्यांची सेवा सुरू आहे. भारतात या डिव्हाईसची किंमत ४ ते ९ हजार रुपयांपर्यंत असून कामाची क्षमता आणि त्यासाठी लागणारे मॉनिटर यावर किंमती ठरलेल्या आहेत.