News Flash

गॅजेट्सची सोनेरी दुनिया

सध्या भारतीय बाजारात अर्थात ई-व्यापार संकेतस्थळांवर आयफोन 6 उपलब्ध आहे.

आयपॅड एअर 2, आयपॅड मिनी 4 आणि आयपॅड प्रो हेही सोन्यामध्ये उपलब्ध आहेत.

भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष महत्त्व आहे. कोणताही सण आला की सोन्याची खरेदी ही आलीच. त्यातच आज गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. यामुळे या दिवशी बहुतांश लोक सोने खरेदीला पसंती देतात. एखादा दागिना किंवा सोन्याचे नाणे घेण्याऐवजी तुम्हाला उपयुक्त गॅजेट तेही सोन्याच्या मुलाम्यासह उपलब्ध झाले तर? यंदा खरेदीसाठी हाही एक पर्याय स्वीकारून पाहा. भारतात किंवा परदेशात ई-व्यापार संकेतस्थळावर असे कोणते गॅजेट्स उपलब्ध आहेत ते पाहू या.

आयफोन आणि बरेच काही

चंदेरी आणि काळसर अशा दोन रंगांत आपली उत्पादने बाजारात आणणाऱ्या अ‍ॅपल या कंपनीने आशिया खंडातील श्रीमंतांच्या खिशात विसावण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी काही तरी हटके करायचे म्हणून सोन्याचा वापर करून उत्पादने बाजारात आणली. अर्थात, ही उत्पादने कंपनीने स्वत: विकसित न करता काही कंपन्यांना उत्पादनातील सोने असलेला भाग विकसित करण्याचे काम दिले. यामध्ये गोल्डजीन या कंपनीचा मोठा वाटा आहे. याची सुरुवात आयफोन 5एसपासून झाली. या कंपनीने आयफोन 6 आणि 6प्लस बाजारात आला तेव्हा २४ कॅरेट सोन्याचा वापर केलेला आयफोन बाजारात आणला होता. त्या वेळेस तब्बल २५०० सोन्याच्या आयफोनची विक्री झाली होती. यानंतर याच कंपनीने सॅमसंगसाठीही असे फोन तयार करून दिले आहेत.

सध्या भारतीय बाजारात अर्थात ई-व्यापार संकेतस्थळांवर आयफोन 6 उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉन या ई-व्यापार संकेतस्थळावर २४ कॅरेट सोन्याचा ६४ जीबीच्या फोनची किंमत ९८ हजार ८७८ रुपये इतकी आहे. हा फोन फॅक्टरी अनलॉक असून यामध्ये आंतरराष्ट्रीय सिम कार्ड वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याचे इतर सर्व फीचर्स हे आयफोन 6 सारखेच आहेत. याशिवाय आयफोन 6 एस आणि आयफोन 7 आणि 7प्लस हेही ई-व्यापार बाजारात उपलब्ध आहेत. मात्र याचे विक्रेते भारतात नसल्याने आपल्याला परदेशी विक्रेत्यांकडून ते मागवावे लागतात. ईबे आणि गोल्डजीन या संकेतस्थळावर आयफोनच्या सर्व आवृत्त्या स्वारोस्की क्रिस्टलसह उपलब्ध आहेत. काही फोन बाहेरून पूर्ण सोन्याचे आहेत. तर काही फोनमध्ये अ‍ॅपलचा लोगो सोन्याचा देण्यात आला आहे. आयफोन 5 पासून ते आयफोन 7प्लस 256 जीबीपर्यंतच्या फोन्सची किंमत ३५० अमेरिकन डॉलर्सपासून ते अगदी तीन हजार १९९ अमेरिकन डॉलर्सपर्यंत आहे. तर काही आयफोनमध्ये अ‍ॅपलचा लोगोवर हिरे लावण्यात आले आहेत. असे हिऱ्यांचा वापर करण्यात आलेले फोनही या बाजारात उपलब्ध आहेत. गोल्डजीन या संकेतस्थळावर तर आयफोनच्या हिऱ्यांच्या उत्पादनांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

याशिवाय आयपॅड एअर 2, आयपॅड मिनी 4 आणि आयपॅड प्रो हेही सोन्यामध्ये उपलब्ध आहेत. तर गोल्डजीन या कंपनीने मॅकबुक प्रो हाही सोन्यामध्ये उपलब्ध करून दिला आहे. तर अ‍ॅपलचे सोन्याचे इअरपॉडही बाजारात उपलब्ध आहेत. २०१३ मध्ये हे सोन्याचे इअरपॉड बाजारात आले होते. यानंतर प्रत्येक सोनेरी आयफोनसोबत सोनरी इअरपॉड बाजारात उपलब्ध करून देण्यात आले. हे इअरपॉड १८ कॅरेटमध्ये उपलब्ध आहेत. तर ब्रिटनच्या एका डिझायनरने आयपॅड 2 हा जुना आयपॅड सोनेरी स्वरूपात बाजारात उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये सोने आणि हिऱ्याचा वापर करण्यात आला आहे. या आयपॅडच्या पुढच्या बाजूसही अ‍ॅपलचा सोनेरी लोगो देण्यात आला आहे. अ‍ॅपलच्या चाहत्यांसाठी ही खास आवृत्ती बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अ‍ॅपलव्यतिरिक्त

अ‍ॅपल कंपनीशी समकक्ष असलेल्या सॅमसंग, एचटीसी या इतर मोबाइल कंपन्यांनीही आपली उत्पादने सोन्याने मढवून बाजारात उपलब्ध करून दिले आहे. गोल्डजीन या संकेतस्थळावर सॅमसंगचे गॅलेक्सी 6 एज स्टॅण्डर्ड, 6 एज स्क्रिप्टो, एस7एज गोल्ड स्टारडस्ट, गॅलेक्सी एस 7 गोल्ड स्टाडस्ट, गॅलेक्सी अल्फा, गॅलेक्सी एस 5, गॅलेक्सी एस6 एज, गॅलेक्सी नोट 5 प्रीजम हे फोन सोन्याच्या मुलाम्यात बाजारात उपलब्ध आहेत. तर एचटीसीचे एचटीसी वन एम 1, एचटीसी वन (एमजी), एचटीसी वन मिनी, एचटीसी वन (एम 8) हे फोन सोन्यामध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय क्वेर्टी कीबोर्डचा जन्मदाता पण काळाच्या ओघात अडगळीत गेलेला ब्लॅकबेरी क्यू10 हा फोनही सोन्याच्या मुलाम्यासह बाजारात उभा आहे. ब्लॅकबेरीच्या चाहत्यांसाठी त्यांचा लाडका फोन जतन करावयाचा असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

इतर गॅजेट्स

फोन व्यतिरिक्त बाजारात सोनीचा वॉकमनही या सोनेरी बाजारात उपलब्ध आहेत. हा प्लेअर एमपीथ्री प्लेअर असला तरी याला वॉकमनचा लुक देण्यात आला आहे. याची किंमत अंदाजे दोन लाख १३ हजार ९६८ रुपये इतकी आहे. याशिवाय फिटबिट या कंपनीने त्यांचा हेल्थ बॅण्ड बाजारात आणला आहे. या हेल्थ बॅण्डला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. यात गन मेटल आणि रोझ गोल्डचे पर्याय आहेत. या हेल्थ बॅण्डची किंमत १६९९९ रुपये इतकी आहे. हृदयाचे ठोके, दिवसभरातील पावलांचा हिशेब मांडणाऱ्या या बॅण्डची पूर्वनोंदणी सुरू असून अ‍ॅमेझॉन या ई-व्यापार संकेतस्थळावर ३१ मार्चपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे.

नीरज पंडित nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 4:31 am

Web Title: gadgets available in india and abroad on e commerce website
Next Stories
1 जुनं ते सोनं
2 बॅटरी वापरा जपून..
3 संरक्षण समाजमाध्यमांचे
Just Now!
X