मोबाइलची स्क्रीन किती असावी, कशी असावी, हा प्रश्न अनेकदा आपल्याला पडत असतो. मात्र अनेकदा आपण स्क्रीन केवळ मोठी आहे म्हणून तो मोबाइल पसंत करतो. पण मोबाइलच्या स्क्रीनमध्ये केवळ त्याचा आकार महत्त्वाचा नसून स्क्रीनची निवड करताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ज्याचा वापर केल्यास आपल्याला मोबाइलचा वापर सुखकर होऊ शकतो. अनेकदा स्वस्तातील स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना स्क्रीनमध्ये अडचणी येत असल्याचे जाणवते. यामुळे स्क्रीनमध्ये नेमके काय असते हे जाणून घेऊ या.

स्क्रीनचा आकार
आपण अनेकदा प्रवास करत असतो. अशा वेळी छोटी स्क्रीन म्हणजे चार इंचांपेक्षा लहान स्क्रीन असलेला फोन बरा वाटतो. असा फोन हाताळण्यास सोपा असतो आणि तो खिशातही सहज राहतो. पण इंटरनेटचे ब्राऊझिंग करत असताना किंवा एखादा व्हिडीओ किंवा चित्रपट पाहात असताना छोटय़ा स्क्रीनमुळे अडचण जाणवू शकते. याचबरोबर जास्त वेळ स्क्रीनकडे पाहणाऱ्यांसाठीही छोटी स्क्रीन उपयुक्त ठरत नाही. तर चार ते ५.५ इंचांची अर्थात मध्यम आकाराची स्क्रीन ही आपल्याला फोन हाताळण्यासाठी खिशात ठेवण्यासाठी आणि इंटरनेट ब्राऊझिंग तसेच व्हिडीओज पाहण्यासाठी उपयुक्त ठरते. ई-मेल्स लिहण्याचे कामही या स्क्रीनवर लहान स्क्रीनच्या तुलनेत जास्त वेगाने करता येऊ शकते. तसेच या स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिले तरी छोटय़ा स्क्रीनच्या तुलनेत कमी त्रास होतो. यापेक्षा मोठी स्क्रीन ही टॅबलेट किंवा फॅबलेटची असते. पुस्तके वाचणे किंवा व्हिडीओ पाहणे, गेम्स खेळणे, इंटरनेट ब्राऊझिंग, संगणकावरील विविध काम करण्यासाठी ५.५ इंचांपेक्षा मोठी स्क्रीन असलेला मोबाइल उपयुक्त ठरू शकतो.
रिझोल्युशन
तुमच्या स्क्रीनच्या आकारासोबतच रिझोल्युशनही महत्त्वाचे असते. रिझोल्युशनमुळे स्क्रीनवरील चित्रांचा दर्जा बदलतो आणि स्क्रीनवर काम करताना आपल्या डोळय़ांना त्रास होणे, पुसटसे दिसणे हे प्रकार होऊ शकत नाहीत. छायाचित्र असलेली माहिती किंवा विविध संकेतस्थळे पाहण्यासाठी रिझोल्युशन महत्त्वाचे ठरते. यामुळे आपल्याला संकेतस्थळ कमी स्क्रोल करावा लागतो. आपल्या फोनला किमान १२८० गुणिले ७२० पिक्सेल, १९२० गुणिले १०८० पिक्सेल अशी असावी. एचडी चित्रपट पाहण्यासाठी स्क्रीनचे रिझोल्युशन १०८० पिक्सेल किंवा ७२० पिक्सेल इतके असायला हवे. कमी रिझोल्युशन असलेल्या फोनमध्ये आपल्याला एचडी चित्रपट पाहता येत नाहीत. याचबरोबर छायाचित्र किंवा संकेतस्थळ पाहात असताना अनेकदा स्क्रोल करावे लागते.
पिक्सेलची घनता
काही फोन हातात घेतल्यावर आपल्याला त्याच्या स्क्रीनवरील अक्षरे वाचतानाही अडचण जाणवते. म्हणजे अशा फोनच्या स्क्रीनमध्ये वापरण्यात आलेले पिक्सेल कमी असतात. आपल्या फोनमध्ये उमटणारी अक्षरे अधिक सुबक दिसावीत, छायाचित्र किंवा व्हिडीओजचा चांगला दर्जा पाहायचा असेल तर पिक्सेलची घनताही महत्त्वाची ठरते. यामुळे आपल्या फोनमध्ये किमान ३०० पीपीआय (पिक्सेल पर इंच) असणे गरजेचे आहे. आयफोनच्या ३२६ पीपीआय असलेल्या स्क्रीन दिल्या जातात. जर ३०० पीपीआयपेक्षा कमी पिक्सेलची स्क्रीन असेल तर मोबाइलच्या स्क्रीनवर उमटलेली अक्षरे अस्पष्ट दिसतात अशीच अडचण छायाचित्र किंवा व्हिडीओ पाहतानही जाणवू शकते.
स्क्रीनचे तंत्रज्ञान
स्क्रीनमध्ये कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते हेही महत्त्वाचे असते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फोन्समध्ये टीएफटी स्क्रीन्स वापरल्या जातात. यामध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसणारे चित्र सर्व बाजूंनी चांगल्या पद्धतीने पाहता येते. मात्र या प्रकारची स्क्रीन आपल्या फोनची बॅटरी मोठय़ा प्रमाणावर खर्च करत असते. तर काही फोनमध्ये
सुपर एलसीडी स्क्रीन वापरलेली असते. यामुळे स्क्रीनचा उजळपणा वाढतो, यामुळे सूर्यप्रकाशातही स्क्रीनवरील अक्षरे वाचणे शक्य होते. तर अनेक ठिकाणी एमओएलईही स्क्रीन वापरली जाते.
यामुळे स्क्रीन अधिक उजळ दिसते याचबरोबर बॅटरीही कमी खर्च होते. मात्र ही स्क्रीन सूर्यप्रकाशात उपयोगी पडत नाहीत. यामुळेच सुपर एएमओएलईडीचा वापर अनेक फोनमध्ये होतो. याशिवाय फोनमध्ये सुपर एएमओएलईडी एचडी स्क्रीनचाही वापर केला जातो.

स्क्रीन संरक्षण काच
मोबाइलच्या स्क्रीनवर संरक्षणासाठी विविध प्रकारच्या काचेचा वापर केला जातो. या काचेमुळे स्क्रीन सुरक्षित राहते आणि मोबाइल वापरणेही अधिक सुकर होते. यामध्ये सध्या गोरिला काचेचा वापर होताना दिसतो. याचबरोबर ड्रॅगन ट्रायलचाही वापर होताना दिसतो. या काचांमुळे स्क्रीनवर स्क्रॅचेस जात नाहीत. तसेच या काचांवर स्क्रॅचगार्डचीही गरज पडत नाही.
नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com