12 December 2017

News Flash

फोनचा ‘स्मार्ट’ वापर

अनेकदा आपल्याला संगणकावर काम करत असताना मोबाइलकडे लक्ष देता येत नाही.

नीरज पंडित | Updated: April 25, 2017 4:42 AM

आपल्या फोनचा स्मार्ट वापर कसा करू शकतो.

आपल्या फोनचा वापर आपण संवादासोबतच मनोरंजनासाठीही करू लागलो आहोत. इतकेच नव्हे तर आता बँकांच्या व्यवहारासाठी किंवा अगदी दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठीही करू लागलो आहोत. पण या फोनमध्ये इतके काही दडले आहे की इतका सर्व वापर करूनही आपण फोनचा केवळ २० टक्केच वापर करत असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. पाहुयात आपण आपल्या फोनचा स्मार्ट वापर कसा करू शकतो.

संगणक नियंत्रण

अनेकदा आपल्याला संगणकावर काम करत असताना मोबाइलकडे लक्ष देता येत नाही. यामुळे त्या कालावधीत अनेक संदेश वाचणे किंवा अनेकांशी संवाद साधणे राहून जाते. यावर पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या मोबाइलने संगणकावर नियंत्रण मिळवू शकता. यासाठी तुम्हाला ‘विन रिमोट कंट्रोल’ हे अ‍ॅप मदत करू शकते. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही विंडोज ऑपरेटिंग प्रणाली असलेला तुमचा संगणक ब्लू-टुथ किंवा वाय-फायच्या माध्यमातून मोबाइलशी जोडू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या मोबाइलवरून संगणक किंवा लॅपटॉपवरील महत्त्वाचे सॉफ्टवेअर्स वापरू शकता. या अ‍ॅपवर तुमच्या संगणकाचा डेस्कटॉप दिसतो. ज्यामुळे तुम्ही मोबाइलवरून संगणकावरील म्युझिक प्लेअर, मीडिया प्लेअर, व्हीएलसी प्लेअर सुरू करू शकतो. याचबरोबर टास्क मॅनेजरच्या माध्यमातून संगणकाचा सीपीयू किती काम करत आहे याचा आलेखही तुम्ही मोबाइलवर पाहू शकता. अ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या फाइल मॅनेजरच्या सुविधेमुळे तुम्ही मोबाइलमधून संगणकावरील छायाचित्रे, व्हिडीओज, इमेज एडिटर आदी पर्यायही वापरू शकता. याद्वारे तुम्ही अ‍ॅड्रेसबार झूम करणे, बंद करणे आदी गोष्टी तुम्ही अ‍ॅपद्वारे नियंत्रित करू शकता. हे अ‍ॅप मोफत आणि पेड अशा दोन स्वरूपात गुगल प्लेवर उपलब्ध आहे.

फोनचा गुगलवर शोध

अनेकदा आपण आपला फोन कोठे तरी ठेवतो मग तो सापडत नाही आणि शोधाशोध सुरू होते. अशावेळी तुम्ही संगणकावर गुगल सुरू करून ‘फाइंड माय फोन’ असे टाइप केल्यावर तुमचा फोन कोठे आहे हे समजू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये जीमेल सुरू करणे आवश्यक आहे. तसेच संगणकावर सर्च करताना जीमेल सुरू करून मग गुगल सुरू केल्यास फोनचा ठावठिकाणा सापडणे सोपा जातो. तुम्हाला त्याचे लोकेशन कळाले की तुम्ही त्याच्यावरून फोनला रिंग देऊ शकता. इतकेच नव्हे तर फोनमधील सर्व माहिती तुमच्या जीमेल खात्यावर साठवू शकता. जर तुमचा फोन चोरीला गेला असेल तरी तुम्ही हा पर्याय वापरून क्रोमच्या प्रायव्हेट ब्राऊजिंगमध्ये जाऊन तुम्ही लॉगइन करावे व त्यानंतर तुमच्या जीमेलचा पासवर्ड बदलावा. म्हणजे चोरटय़ाने जरी फोन सुरू केला तरी तुमची माहिती त्याच्यापर्यंत पोहचू शकणार नाही. जीमेलच्या द्वारे तुम्ही फोन लॉकही करू शकता.

विंडोज 8 नियंत्रक

तुमचा विंडोज 8 किंवा त्यापुढील ऑपरेटिंग प्रणाली असलेला संगणक नियंत्रित करण्यासाठी ‘विंडोज 8 कंट्रोलर’ हे अ‍ॅप तुम्ही वापरू शकता. या अ‍ॅपमध्ये वाय-फायच्या साह्याने जोडणी केल्यानंतर तुमच्या मोबाइलच्या स्क्रीनवर विंडोज 8ची होम स्क्रीन येते. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही संगणकावरील किंवा लॅपटॉपवरील सर्व गोष्टींचे नियंत्रण करू शकता. म्हणजे अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या फाइल सुरू करणे व एडिट करणे सेव्ह करणे आदी गोष्टी करू शकतो. याद्वारे तुम्ही यू-टय़ुब किंवा गुगलसर्च, फेसबुक किंवा ट्विटरचा वापरही करू शकता. हे अ‍ॅप मोफत आणि पेड अशा दोन स्वरूपात गुगल प्लेवर उपलब्ध आहे.

मित्राच्या फोनवरून तुमच्या फोनचा वापर

तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला निघालात आणि तुमचा फोन सोबत आणायला विसरलात. तर दिवसभर फोनशिवाय कसा काढायचा हा प्रश्न आपल्याला पडतो. अनेक महत्त्वाचे संदेश येणार असतात. अशावेळी तुम्ही तुमच्या विश्वासू मित्राच्या फोनमधून तुमच्या फोनचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या मित्राच्या मोबाइलमध्ये पाहुणे वापरकर्ते म्हणून तुमचे जीमेलचे लॉगइन करू शकता. हे लॉगइन केल्यावर तुमच्या फोनचा सर्व तपशील त्या लॉगइनमध्ये दिसू लागतो. म्हणजे तुमचे संदेश, छायाचित्रे आदी गोष्टी तिथे दिसू लागतात. यामुळे तुम्ही तुमच्या फोनपासून लांब राहण्याऐवजी मित्रांच्या फोनमधून तुमच्या फोनचा वापर करू शकता.

ऑटो अनलॉक

फोनला सुरक्षा म्हणून आपण पासवर्ड ठेवतो. पण फोन सतत वापरायचा असेल तर दरवेळेस फोन अनलॉक करताना पासवर्ड टाकण्याची प्रक्रिया कंटाळवाणी वाटू लागते. यामुळे तुम्हाला सुरक्षित वाटत असलेल्या ठिकाणी तुमचा फोन आपोआप अनलॉक होऊ शकतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही अ‍ॅपची आवश्यकता नसून ती फोनमध्ये अंतर्गत सुविधा म्हणूनच देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये जा. तेथे स्मार्ट लॉक पर्याय निवडा. तेथे ट्रस्टेड प्लेसेस या पर्यायामध्ये तुम्ही ठिकाणे सेव्ह करून ठेवू शकता. याचबरोबर तुम्ही यामध्ये विश्वासार्ह आवाज आणि विश्वासार्ह उपकरणही सेव्ह करून ठेवू शकता.

नीरज पंडित @nirajcpandit  

Niraj.pandit@expressindia.com

First Published on April 25, 2017 4:42 am

Web Title: smart usage of mobile phones