आंतरराष्ट्रीय स्तरावर लंगडी खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या भिवंडी तालुक्यातील अनगावमधील लंगडीपटूचा अपघाती मृत्यू झाला आहे. रेहान अकील शेख (वय १७) राहत्या घराच्या टेरेसवरुन लंगडीचा सराव करून खाली उतरत असताना तो पाय घसरून खाली पडला. या अपघातानंतर त्याला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याने रुग्णालयात प्राण सोडले.  भिवंडी तालुक्यातील अनगांव येथील शं. ना. लाहोटी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये शिकणारा रेहान हा इयत्ता पाचवीपासून लंगडी खेळात सहभागी होऊ लागला. त्याच्या चमकदार कामगिरीने तो राष्ट्रीय पातळीवर चमकला. मध्यप्रदेशमधील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तर जानेवारी २०१७ मध्ये महाविद्यालयीन स्तरावर नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई लंगडी स्पर्धेत त्याने भारतीय युवा संघाचे नेतृत्व करत सुवर्णपदक पटकावले होते.

त्याची सिंगापूर येथे होणाऱ्या आशियाई लंगडी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. रेहान या स्पर्धेसाठी घराच्या टेरेसवर सराव करत असताना पाय घसरून तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेहानचे लंगडी खेळा सह कबड्डी, खोखोमध्ये सुध्दा शाळेला पारितोषिके मिळवून दिली होती. लंगडी या खेळात विशेष आवड होती. ती शाळेने जोपासत शाळेच्या नेतृत्वाखाली संघाने जिल्हा राज्य स्तरीय असंख्य स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याच्या जाण्याने संपूर्ण शाळेतील, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये लंगडी खेळाच्या गटात शं. ना. लाहोटी शाळेच्या संघातून रेहान शेख हा गुणी खेळाडू गवसला. चमकदार कामगिरीने त्याने दहा वर्षांखालील गटात जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भिवंडी तालुक्याला अजिंक्यपद पटकावून दिले. जिल्हास्तरीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली जिल्हा अजिंक्यपद पटकाविल्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपविली गेली. त्याने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली. नेपाळ येथील स्पर्धत सुवर्ण पदक विजेत्या संघात त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. लवकरच तो सिंगापूर येथे आशियाई लंगडी स्पर्धत खेळण्यासाठी जाणार होता. त्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने सरावास सुरवात केली होती. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने लंगडी खेळातील सचिन हरपल्याची भावना त्याचे प्रशिक्षक सागर भोईर यांनी व्यक्त केली.