अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरमध्ये २५ फेब्रुवारीला चित्र स्पष्ट

बदलापूर : गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा पुढे ढकलल्या गेलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण सोडतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या मंगळवारी, २५ फेब्रुवारी रोजी दोन्ही नगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत होणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आरक्षणाच्या प्रतिनिधित्वासंबंधी आलेल्या नव्या आदेशामुळे आरक्षणाची गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ येत्या १७ मे रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात निवडणूक आयोगाने निवडणूकपूर्व तयारीसाठी कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र दोन महिन्यांत दोन वेळा या कार्यक्रमात बदल करण्यात आला होता. त्यामुळे पहिल्यांदा २७ जानेवारी आणि दुसऱ्यांना १८ फेब्रुवारी रोजी होणारी प्रभाग आरक्षणांची सोडत पुढे ढकलण्यात आली होती. निवडणूक आयोगाने पालिकांनी सादर केलेल्या प्रारूप प्रभागांच्या रचनेला मंजुरी देण्यात दिरंगाई केल्याने ही आरक्षण सोडत पुढे ढकलली गेल्याचे बोलले जात होते. मात्र वाढलेली लोकसंख्या, प्रभागांची रचना आणि प्रभागांना मिळालेले आरक्षणाचे प्रतिनिधित्व यावर सखोल चर्चा झाल्यानंतरच प्रारूप प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी दोन्ही नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत पार पडणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेची ५७ प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत पालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात सकाळी १० वाजता पार पडेल. यासाठी उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी कामकाज पाहतील. तर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची ४७ प्रभागांसाठी आरक्षण सोडत पूर्वेतील आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी तीन वाजता पार पडणार आहे. या वेळी अन्न व नागरी पुरवठा अधिकारी कामकाज पाहतील. त्यामुळे दोन्ही शहरांतील नगरपालिकांच्या प्रभागाचे चित्र २५ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.

दोन वेळा पुढे ढकलण्यात आलेला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम, प्रभाग रचना, आरक्षणासाठी शासनाचे नवे मार्गदर्शन आणि गेल्या तीन निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रभागाला मिळालेले आरक्षणनिहाय प्रतिनिधित्व यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. प्रभागांची फेररचना झाली नसली तरी प्रगणन गटांप्रमाणे प्रभागांच्या सीमा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग आरक्षणावरही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. या सर्व बाबींमुळे राजकीय पक्षांनी मांडलेले आडाखे फोल ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.