लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार ते पाच आमदार घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. पण, आमदारांनी माघार घेतल्याने त्यांचा बंड फसला. त्यांनी वारंवार बंड करून पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी केला. तुमची सर्व प्रकरणे माझ्याकडे आहेत. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. २२ वर्षानंतर तुम्हाला पोपटासारखा कंठ फुटला आहे. पण, तुमचा पोपट होणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांसाठी आनंद दिघे हे उमेदवारांची यादी मातोश्रीवर पाठवायचे आणि ती यादी मातोश्रीवर एकमताने मंजुर व्हायची. बाळासाहेबांचा दिघे यांच्यावर विश्वास होता. २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील सैन्य घेऊन कल्याणमध्ये मुलाच्या प्रचारासाठी नेले होते. त्यावेळेस मी निवडून आलो आणि २०१९ मध्येही निवडून आलो. मुख्यमंत्री हे केवळ स्वत: आणि मुलापुरतेच राजकारण करतात. मी सामान्य कार्यकर्ता आहे. पैसे खर्च करून कधीच निवडून आलो नाही. माझ्याकडे काय खोके नव्हते. पण, बाळासाहेब आणि दिघे यांच्यामुळे मला न मागता सर्व काही मिळाले. मुख्यमंत्र्यांची दोन मुले गेली, तेव्हा मी स्वतः त्यांच्यासोबत होतो, असेही विचारे म्हणाले.
आणखी वाचा-शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी, शाह यांचे आभार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आनंद दिघे यांच्या नावाने धर्मवीर चित्रपट काढला. त्यासाठी तुम्ही खिशातले पैसे कुठे काढले. सर्व कार्यकर्त्यांनी पैशांनी तिकीट काढून चित्रपट पाहिला, असेही ते म्हणाले. तुमच्याकडे सर्व महापालिका होत्या. तिथे तुम्ही तिथे भ्रष्टाचार करत होतात. पालिकेत गोल्डन गँग कुणाला म्हणायचे आणि कशाप्रकारे निविदेची सेटींग करायचे. पालिकेची वाट लावून ठेवली आहे. ठाण्याच्या जनतेचा पैसा विकासकामांसाठी आहे, तो तुमचे पोट भरण्यासाठी नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे मी बघितले असून मी पक्षाशी अजूनही प्रामाणिक आहे. तुमच्यासारख्या गद्दार झालेलो नाही. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा हक्क नाही. टेंभी नाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून त्याठिकाणी शिंदे यांनी स्वत:चे बॅनर लावले. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली त्यामुळे दिघे यांच्यावरील प्रेम काय होते, हे मला बोलायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला. नरेश म्हस्के देखील शिंदे यांना वैतागून काँग्रेसमध्ये जाणार होते, त्याला देखील मीच रोखले होते, असेही ते म्हणाले. नरेश म्हस्के करोना काळात घरात बसून होता, असा आरोपही त्यांनी केला.