ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमधून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असतानाच आता उशिरा का होईना महापालिका प्रशासनाला खड्डे बुजविण्याची उपरती झाली आहे. शहरातील खड्डय़ांच्या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश देत या मोहिमेसाठी मंगळवारपासून स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरातील महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. घोडबंदर भागातील सेवारस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेऊन खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश दिले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहेत. त्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्त जयस्वाल यांनी दिल्या आहेत.  भर पावसात सिमेंट किंवा डांबराचा वापर करून खड्डा भरणे शक्य नसले तरी पर्याय म्हणून पेव्हर ब्लॉकने खड्डे भरण्यास सुरुवात करावी. तसेच सर्व अभियंत्यांनी आपापल्या प्रभागात फिरून खड्डय़ांची स्थिती तपासावी आणि बांधकाम साहित्य वापरून किंवा पेव्हर ब्लॉक वापरून खड्डे भरावेत, असे आदेशही त्यांनी दिले.

अन्य यंत्रणांनाही आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रातील खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश देण्याबरोबरच शहरातील खड्डय़ांचा वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्त जयस्वाल यांनी बांधकाम विभागाला केल्या आहेत. तसेच पावसाळ्याच्या कालावधीत आरोग्य, घनकचरा, पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागासह सर्व यंत्रणांनी रस्त्यावर उतरून कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.