मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
डोळ्याचे पारपटल व्यवस्थित असेल तर दृष्टिहीन व्यक्तीही नेत्रदान करू शकते, ही वस्तुस्थिती समजल्यानंतर ठाण्यातील पांडुरंग शेलार यांनी स्वयंस्फूर्तीने नेत्रदानाचा अर्ज भरला आहे. अंध व्यक्तींचा हा डोळस दृष्टिकोन नेत्रदान चळवळीचा प्रसार होण्यास पूरक ठरेल, असा विश्वास नेत्रदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीपाद आगाशे यांनी व्यक्त केला आहे.
मूळ गिरगावकर असणाऱ्या पांडुरंग शेलार यांना ते मस्कतमध्ये नोकरी करीत असताना १९८५ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी दृष्टिदोष जडला. पुढे १९९० पासून तर त्यांना पूर्ण दिसेनासे झाले. मात्र आल्या परिस्थितीला त्यांनी धीराने तोंड दिले. राष्ट्रीय अंध विद्यालयातून (नॅब) त्यांनी पुनर्वसन प्रशिक्षण पूर्ण केले. त्या प्रशिक्षणाने या अंधारातही त्यांना प्रकाशवाट दिसली. मुंबईत ब्रीच कॅन्डी रुग्णालयाबाहेर त्यांना सार्वजनिक दूरध्वनी स्टॉल मिळाला. गेली २५ वर्षे या स्टॉलच्या साहाय्याने ते आपली उपजीविका करीत आहेत. नेत्रदान चळवळीत कार्यरत असलेले ठाण्यातील श्रीपाद आगाशे यांच्याकडून पारपटल व्यवस्थित असेल तर अंध व्यक्तीही नेत्रदान करू शकते, हे समजल्यावर पांडुरंग शेलार यांनी तातडीने नेत्रदानाचा अर्ज भरला. अंधांचे हे नेत्रदान डोळस व्यक्तींच्या डोळय़ांत अंजन घालणारे ठरेल, असे आगाशे यांनी सांगितले.
‘नेत्रपडदा (रेटीना) आणि पारपटल (कॉर्निया) हे डोळ्याचे दोन भाग असतात. अनेक अंध व्यक्तींचा नेत्रपडदा निकामी असला तरी पारपटल चांगले असते. त्यामुळेच अंध व्यक्तीही नेत्रदान करू शकते,’ अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजित वाडेकर यांनी दिली.

मिराणींची ‘दिव्यदृष्टी’
वर्तकनगरमध्ये राहणाऱ्या वसंत आणि विजया या मिराणी दाम्पत्याच्या सहजीवनात अंधत्वामुळे अंधाराशिवाय काहीही नाही. मात्र स्वत:च्या नशिबाला दोष न देता हे दोघे अरिहंत अंध सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून इतर अंधांच्या पुनर्वसनासाठी यथाशक्ती मदत करत आहेत. ‘अंधांचे पुनर्वसन ही फार मोठी समस्या असते. मी स्वत: काहीही मदत देऊ शकत नसलो तरी इतरांना मदत देण्यास उद्युक्त करतो,’ अशा शब्दांत त्यांनी समाधान व्यक्त केले.