दहशतवादी कृत्य आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे स्थानकात सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी कल्याण पलिकडच्या अनेक स्थानकांमध्ये या यंत्रणेचे नियंत्रण अजूनही सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कल्याण पलिकडच्या रेल्वे स्थानकांवर सीसीटिव्ही बसवण्यास दोन महिन्यांपुर्वी सुरूवात झाली आहे. हे काम बऱ्याच स्तानकांमध्ये पुर्ण झाले आहे. मात्र, सीसीटिव्हीचे नियंत्रण रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आले नसल्याने अनेक ठिकाणी कॅमेरे आहेत पण चित्रीकरण नाही, अशी अवस्था आहे. या परिसरात होणाऱ्या चोरी आणि गुन्हेगारीच्या घटना उलगडण्यासाठी लागणारे सीसीटिव्ही चित्रिकरण उपलब्धच होत नसल्याने रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कल्याण पलिकडच्या वांगणी, शेलू, शहाड, कसारा, टिटवाळा आणि कसारापर्यंतच्या स्थानकांमध्ये ही परिस्थिती कायम आहे.
मध्य रेल्वे स्थानकातील अतिरेकी कारवाया आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई आणि ठाण्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानकात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले. कल्याण पलिकडच्या रेल्वे स्थानकात २०१५ पर्यंत एकही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता. महिला सुरक्षेच्या दृष्टीने या भागात कॅमेऱ्यांची गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जानेवारी महिन्यात या स्थानकांमध्ये कॅमेरे बसवण्यास सुरूवात केली. त्यामध्ये कल्याण पलिकडच्या कसारा पर्यंतच्या सर्व स्थानकांचा समावेश करण्यात आला. हे काम पुर्ण होताच प्रवासी या भागात पाकिटमार, बॅग खेचणारे आणि सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाकडे सीसीटिव्ही चित्रिकरण तपासण्याची मागणी करू लागले. मात्र या कॅमेऱ्यांचे नियंत्रण अद्याप रेल्वे सुरक्षा दलाकडे देण्यात आले नसल्याने ही चित्रिकरणे उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात येत आहे.
गेली अनेक वर्ष या भागामध्ये कॅमेरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे या भागातील अनेक गुन्हेगारी घटनांचा अद्याप उलगडा झालेला नाही. आता या स्थानकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने प्रवाशांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली होती. मात्र कॅमेऱ्यांचे चित्रिकरण बंद असल्याची गोष्ट उघड झाल्यानंतर प्रवाशांचा भ्रमनिरास झाला आहे. विरारमध्ये झालेल्या हत्येचा प्रश्र्वभुमीवर या भागातील कॅमेरे सुरू करून त्याचे नियंत्रण तात्काळ सुरक्षा दलाकडे देण्यात यावे.
-राजेश घनघाव, कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटना

कल्याण पासून कर्जत पर्यंतच्या स्थानकांपैकी अंबरनाथ, बदलापूर स्थानकातील सीसीटिव्हींचे काम पुर्ण झाले असून त्याचे नियंत्रण सुरक्षा दलाकडे देण्यात आले आहे. मात्र वांगणी आणि शेलू येथे प्रत्येक स्थानकात १२ सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. या स्थानकातील कामे अपुर्ण असल्याने तेथील नियंत्रण अद्याप रेल्वे सुरक्षा दलाकडे मिळालेले नाही.
– एस.पी.सिंग, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, रेल्वे सुरक्षा दल बदलापूर