निवडणुकीच्या मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाकडून तयार केल्या जातात. या मतदार याद्यांमध्ये दुरुस्त्या किंवा नवीन सहभागाची माहिती द्यायची असेल तर तो अधिकार फक्त भारत निवडणूक आयोगाला आहे. त्यामध्ये राज्य निवडणूक आयोग हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी, कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये झालेला गोंधळ निस्तरण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

पालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी पालिका आयुक्त ई. रवींद्रन, पोलीस आयुक्त परमरवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण व इतर निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रभागातील नावे अन्य प्रभागात टाकण्यात आली आहेत. एकाच घरातील नावे वेगळ्या दोन प्रभागातील यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रभागातील उमेदवाराचे नाव त्या मतदार यादीतून गायब करण्यात आले आहे. मूळ मतदार यादी व त्याच पद्धतीने तयार करण्यात आलेली सीडी यांचा ताळमेळ जुळत नसल्याचे उमेदवारांच्या निदर्शनास आले आहे. काही सीडी रिकाम्या आहेत. याविषयी पत्रकारांनी सहारिया यांना प्रश्न विचारले, त्यावेळी त्यांनी हा घोळ निस्तरण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाचे नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत केलेल्या साडेसहा हजार कोटीच्या पॅकेजबाबत काँग्रेसने तक्रार केली आहे. याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे सहारिया यांनी स्पष्ट केले. मतदार याद्यांमध्ये गोंधळ घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून, मतदार याद्या सुधारित करण्याची मागणी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्त, पालिका आयुक्तांकडे केली आहे