अंबरनाथमध्ये यंदा रेल्वे जीआयपी टँक या मुख्य विसर्जनस्थळी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने गणेश भक्तांचे हाल होत आहेत. नगरपालिकेकडून या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथे गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून त्यांच्या तक्रारी ऐकण्यासही फारसे कुणी पुढे येताना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बदलापुरात विसर्जनासाठी सगळ्यात जास्त गर्दी असलेल्या पश्चिमेकडील उल्हास नदीवर मात्र नगरपालिकेने यंदा कृत्रिम तलाव न बांधता पूर्वेकडील शिरगाव येथे बांधल्याने उल्हास नदीवर भाविकांची गर्दी लोटली असून पर्यावरणपूरक उत्सवाच्या संकल्पनेला हरताळ फासला गेला आहे.
अंबरनाथच्या एमआयडीसी भागात असलेल्या रेल्वेच्या जीआयपी टँक येथे दरवर्षी अंबरनाथमधील बहुसंख्य भाविक गणेश विसर्जनासाठी येतात. या ठिकाणी मुख्य रस्त्यापासून तलावापर्यंत जाण्यासाठी मातीचा कच्चा रस्ता असल्याने पावसाने तो निसरडा होतो. त्यामुळे दरवर्षी येथे मोठे दिवे लावणे, रस्त्यावर ग्रीट पावडर टाकणे, मंडप उभारणे अशी कामे केली जातात. मागील वर्षीपर्यंत ही कामे व्यवस्थित होत होती. यंदा या ठिकाणी विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना फारशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पावसामुळे निसरडय़ा झालेल्या मातीच्या रस्त्यावरून गडद काळोखात हातात गणेशमूर्त्यां घेऊन भाविकांना तलावापर्यंत जावे लागले. त्यामुळे अनेक अपघातही झाले.अग्निशमन दलाचे कर्मचारी व अवघे २ पोलीस वगळता येथे अन्य कुणीही शासकीय कर्मचारीही आढळून आले नाहीत.
बदलापुरात गर्दीच्या उल्हास नदीवर कृत्रिम तलाव नाही
बदलापुरात यंदा पालिकेने पश्चिमेकडील उल्हास नदीवर विसर्जनस्थळी भाविकांसाठी चांगल्या सोयी केल्या असल्या तरी कृत्रिम तलाव मात्र केलेला नाही. हा तलाव पूर्वेकडील शिरगाव भागात बांधल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. येथील उल्हास नदीवर मोठय़ा प्रमाणावर गणेश मूर्तीचे विसर्जन होते. ही गर्दी आटोक्याबाहेर जाणारी असते. तसेच नदीमध्ये प्रदूषण होऊन नये म्हणून कृत्रिम तलाव येथे बांधण्यात येतो. मात्र, हा तलाव बांधण्यात न आल्याने सगळ्याच मूर्तीचे विसर्जन नदीत होत आहे.त्यामुळे भाविकांच्याही रांगा लागत आहे. कृत्रिम तलाव या वर्षी नदीवर का बांधण्यात आला नाही, या विषयी भाविक प्रश्न उपस्थित करत आहेत. नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, उल्हास नदीला पाऊस झाल्याने पाणी वाढले असल्याने कृत्रिम तलाव बांधण्यात आलेला नाही. तो पूर्वेकडील शिरगाव येथे बांधण्यात आला आहे.

दोन तरुण तलावात बुडाले
अंबरनाथमध्ये शुक्रवारी दीड दिवसांच्या गणपतींना तर सोमवारी पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. मात्र यावेळी शहरातील जीआयपी टँक येथे कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात न आल्याने भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भाविकांना यावेळी दुखापतीही झाल्या. त्यातच शनिवारी विसर्जनासाठी आलेले सुनील मोरे (१७) व सोनू महिरे (२०) हे दोन तरुण पाण्यात बुडाले. पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.