टिटवाळा येथील श्रीगणपती मंदिरालगतच्या तलावाच्या एका कोपऱ्याला मोठय़ा प्रमाणात मेलेले मासे काही भाविकांना आढळून आले आहेत. या तलावात भाविक प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाव, टाकाऊ वस्तू फेकून देत आहेत. तलावांच्या कोपऱ्याला मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. त्यात कडक उन्हामुळेही हे मासे मेले असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मंदिराजवळील तलावामध्ये भाविकांनी कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये, म्हणून मंदिर व्यवस्थापन, तलाव व्यवस्थापक काळजी घेतात. तरीही त्यांच्या नजरा चुकवून काही भाविक तलावात प्लॅस्टिक पिशव्या टाकतात. काहीजण माशांना पाव टाकून त्यांच्याशी खेळण्याचा प्रयत्न करतात. निर्माल्य, फुलेही तलावात टाकण्याचा प्रयत्न केला जातो. पाण्याच्या बाटल्या तलावात फेकण्यात येतात. त्यामुळे तलावात घाण आणि गाळ तयार होतो. मासे पाव खाण्यासाठी किनाऱ्याला आले की, गाळामधील विषार सहन न झाल्याने आणि उन्हाच्या चटक्याने मरत असल्याचा अंदाज एका स्थानिकाने वर्तविला