‘स्वाइन फ्लू’ने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शिरकाव केला आहे. ‘स्वाइन फ्लू’चे ११ संशयित रुग्ण महापालिका हद्दीत आढळले आहेत. चार रुग्णांना ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाली आहे. सर्व संशयित रुग्ण वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
‘स्वाइन फ्लू’ला रोखण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने बालवाडी, अंगणवाडी, पालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रुग्ण नातेवाईकांसाठी विशेष मार्गदर्शन केंद्रे सुरू आहेत. पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयात विशेष कक्ष  आहे. पालिका हद्दीतील सर्व खासगी डॉक्टरांना ‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांची माहिती पालिका अधिकाऱ्यांना देण्याचे सूचित करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये या साथीविषयीची जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी कानपूरहून आलेल्या एका महिलेला ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाल्याने तिला मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.