पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर; ठाण्यात विसर्जनस्थळी ४८ टन निर्माल्याचे संकलन
पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना घरोघरी पोहचू लागल्याने यंदाच्या वर्षी शहरातील विविध गणेश विसर्जन घाटांवरून थर्माकोल हद्दपार झाल्याचे चित्र दिसून आले. सजावटीमध्ये पर्यावरणस्नेही साहित्यांचा वापर वाढल्याने हे प्रमाण घटले असून यंदा केवळ १ टक्क्य़ाहूनही कमी प्रमाणात थर्माकोल विसर्जन घाटापर्यंत आणण्यात आल्याची माहिती निर्माल्य संकलन करणाऱ्या समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने देण्यात आली आहे. यंदा विसर्जन घाटावर दीड दिवसाच्या काळात सुमारे २१ टन तर पाच दिवसांच्या गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी २७ असे ४८ टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ या संस्थांच्या माध्यमातून शहरातील निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला जातो. शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या सोबत तयार होणारे निर्माल्य संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या खत प्रकल्पावर पोहचवले जाते. पूर्वी पाण्यामध्ये विसर्जित केल्यामुळे या निर्माल्यामुळे जलप्रदूषण होत होते. मोठय़ा जनजागृतीमुळे हे प्रमाण आता घटू लागले असून नागरिक निर्माल्य संस्थेच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करतात.
कोपरी येथील संस्थेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये हे निर्माल्य जमा करून त्यांच्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने देण्यात आली. गणेश सजावटीतून थर्माकोल हद्दपार झाले असले तरी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर मात्र वाढला आहे. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून निर्माल्य आणले जात होते.