घरात एखादा कुत्रा पाळणे ही पाळीव प्राण्यांबद्दल असलेल्या प्रेमाची जशी खूण आहे, त्याचप्रमाणे काही पक्ष्यांनादेखील आपल्या घरात जागा दिली जाते. या पक्ष्यांशीसुद्धा मालकाकडून तेवढेच भावनिक नाते जपले जाते. आफ्रिका खंडात अतिशय लोकप्रिय असलेला हा बोलका पक्षी म्हणजे ‘ग्रे पॅरट’.
स्वत:जवळ असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता आणि माणसालादेखील लाजवेल अशी स्मरणशक्ती या आपल्या गुणवैशिष्टय़ांमुळे ‘ग्रे पॅरट’ ही पक्ष्यांची प्रजात जगभरात प्रसिद्ध आहे. आफ्रिका खंडात जंगलतोड करत असताना काही युरोपियन लोकांना ग्रे पॅरट या पक्ष्याचे पिल्लू सापडले. युरोपियन लोकांनी हे पक्ष्याचे पिल्लू सांभाळताना या पक्ष्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची जाणीव त्यांना झाली. कालांतराने पक्ष्याची ही प्रजात विकसित करण्यात आली. जंगलातून हे पक्षी घरी पाळण्यासाठी लोक नेऊ लागले आणि या पक्ष्याच्या जातीचा शोध लागला. साधारण १३ इंच एवढी उंची असलेल्या ‘ग्रे पॅरट’ पक्ष्याच्या कोंगो आफ्रिकन ग्रे आणि टीमने आफ्रिकन ग्रे अशा दोन प्रजाती आहेत. जंगलात आढळणाऱ्या ग्रे पॅरटला वाइल्ड स्कॉट, तर घरात हाताळणाऱ्या ‘ग्रे पॅरट’ला ‘हॅंड टेम्ड’ असे म्हणतात. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील अंगोला, गुनिया, अन्झानिया या भागात मोठय़ा प्रमाणात ग्रे पॅरट आढळतात. भारतामध्ये हैदराबाद आणि कलकत्ता येथे ग्रे पॅरटचे ब्रीडिंग केले जाते.
ग्रे पॅरट ही पोपटाची प्रजात कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी ओळखली जाते. या पक्ष्याला दिलेली शिकवण पटकन आत्मसात करण्यास ते तत्पर असतात. हा पक्षी शंभर शब्द आपल्या स्मरणात ठेवू शकतो. योग्य प्रकारे प्रशिक्षण दिल्यास दोन ते चार वर्षांत ग्रे पॅरट बोलायला शिकतो. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून आजूबाजूच्या लोकांचे लक्ष हे वेधून घेतात. बॅंकेचे खाते क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक हे चोख लक्षात ठेवतात. एखाद्याची नक्कल करण्यात ग्रे पॅरट अग्रेसर असतात. इतर पक्ष्यांमध्ये नसलेल्या बुद्धिमत्ता, चातुर्य आणि स्मरणशक्ती या सर्व गुणवैशिष्टय़ांमुळे ग्रे पॅरटला आईनस्टाईन ऑफ बर्ड असे म्हटले जाते. या पक्ष्याची अफाट स्मरणशक्ती, चातुर्य यावर संशोधन सुरू असून संशोधकांपुढे हे कोडे आहे. अमेरिकेतील डॉ. पेपर बर्ग यांनी त्यांच्या अ‍ॅलेक्स नावाच्या ग्रे पॅरटवर संशोधन केले होते. अ‍ॅलेक्स १०० शब्द आणि शब्दांचे अर्थ अचूक सांगायचा. यावरून या पक्ष्याच्या बुद्धिमत्तेची कल्पना येते.
एकटे राहणे कठीण
ग्रे पॅरट हा पक्षी साधारण शंभर पक्ष्यांच्या कळपात राहत असल्याने त्यांना एकटे राहणे कठीण असते. घरात पाळल्यावरदेखील घरातील सदस्यांना या पक्ष्याच्या सोबत राहावे लागते. एकटे वाटल्यास हा पक्षी पटकन कंटाळतो. आपली पिसे काढण्यास सुरुवात करतो. स्वत:चे संरक्षण हा पक्षी करू शकत नाही. अतिशय प्रेमळ असणारा हा ग्रे पॅरट घरात जसे बोलले जाते तसे आत्मसात करतो. आपण उच्चारलेला शब्द हुबेहूब तसाच उच्चारून घरातील सदस्यांचे देखील मनोरंजन होत असते.
फलाहार हवा.. चॉकलेट, कॉफी हानिकारक
हे पक्षी शाकाहारी असल्याने साधारण फळांमध्ये सगळीच फळे ग्रे पॅरटला खाण्यास उत्तम ठरतात. मात्र कीटकनाशके फवारणी केलेली फळे, कॉफी, चॉकलेट, बाजारात मिळणारे मीठ, साखर, तूप लावलेले पदार्थ, चिप्स, मशरूम, कांदा, पोळी, ब्रेड यासारखे पदार्थ या पक्ष्यांच्या शरीराला हानिकारक असतात.

सतत कार्यरत ठेवणे गरजेचे
ग्रे पॅरट पक्ष्यांच्या चोचीमध्ये प्रचंड ताकद असल्याने कठीण कवच असलेले फळ हे पक्षी खाऊ शकतात. कायम कसरती करण्याची यांची सवय असते. या कारणाने ग्रे पॅरटला कायम कार्यरत ठेवावे लागते. सतत खेळणी किंवा कॅल्शिअम बोन त्यांच्याजवळ ठेवावे लागते. या पक्ष्यांसाठी असलेल्या पिंजऱ्यात झोपाळे आणि दोऱ्या लावलेल्या असल्यास सतत त्यावर उडय़ा मारताना हा पक्षी दिसतो.

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
chess
भारतीय बुद्धिबळपटू सज्ज; प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला आजपासून प्रारंभ