रायलादेवी

स्मार्ट सिटीचा गवगवा करत शहरात सर्वत्र रस्ता रुंदीकरणाची कामे मोठय़ा धडाक्यात सुरू असल्याने ठाणेकरांना अच्छे दिनाची अनुभूती येत असल्याचा दावा एकीकडे येथील प्रशासन आणि राजकीय व्यवस्था करत असली तरी महापालिकेवर वर्षांनुवर्षे सत्ता गाजविणाऱ्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या वागळे इस्टेट तसेच आसपासच्या परिसराची इतक्या वर्षांनंतरही दैना कायम असल्याचे चित्र आहे. नौपाडा, पाचपाखाडी इतकीच ठाणे शहराची ओळख मर्यादित नाही. या शहराच्या डोंगराकडच्या भागातही काही लाखांच्या घरात लोकवस्ती आहे. बकाल ठाणे अशी या परिसराची आजवरची ओळख असली तरी हा बट्टा पुसण्यासाठी इतक्या वर्षांत फारसे काही झालेले नाही.  इंदिरानगर, साठेनगर, अंबेवाडी, जयभवानी नगर, श्रीनगर, वारलीपाडा, रामनगर, कैलासनगर, किसन नगर, एम.आय.डी.सी, नेहरू नगर, अंबिका नगर यांसारखे भाग वागळे इस्टेट परिसरात मोडतात. पालकमंत्री एकनाथ िशदे यांचा हा बालेकिल्ला. महापालिकेतील उच्चपदस्थही याच परिसरातून निवडून येत असतात. तरीही विकासाची गंगा म्हणावी त्या प्रमाणात या भागात का पोहचत नाही, हा सवाल येथील रहिवाशांच्या मनात कायम आहे.

प्राथमिक सोयींची वानवा.

या भागांमध्ये पाण्यापासून ते शौचालयापर्यंत सर्वच प्राथमिक गरजांसाठी झगडावे लागते. लोकसंख्या वाढली तरी येथे सार्वजनिक शौचालयांच्या संख्येत गेल्या १५ वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. बहुतांश शौचालयांची अवस्था दयनीय आहे. तेथील सांडपाणी थेट रस्त्यावर पसरत असल्याने रोगराईला आमंत्रण मिळत असल्याचे चित्र जागोजागी दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही महापालिका दाद देत नाही, अशा तक्रारीही पुढे येत असतात.

[jwplayer 9zAV12MZ]

thane-prabahg-chart

चिंचोळ्या रस्त्यांवरचा खडतर प्रवास.

नितीन कंपनीकडून इंदिरानगर नाक्याच्या दिशेने जाणारा रस्ता बऱ्यापैकी रुंद असूनही त्याच्या दोन्ही बाजूंनी केले जाणारे बेशिस्त पार्ंग, गॅरेजने अडवलेल्या जागा, रिक्षांची गर्दी, यामुळे रस्ता वापरण्यास अपुरा पडू लागला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून वारंवर बंद करण्यात आलेला मंगळवारचा आठवडी बाजारही जागा बदलून सुरू असल्याने मंगळवारी या भागात पाय ठेवायलाही जागा नसते. श्रीनगरसारख्या भागात दाटीवाटीने वसलेल्या इमारतींमधून जाणारे रस्ते चिंचोळे आहेत. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना होत असलेल्या पार्किंगमुळे येथून वाहने चालविताना नाकीनऊ  येतात. हनुमाननगर, राममगर, वारलीपाडा येथील डोंगर उतारावर वसलेल्या झोपडय़ांसह दाटीवाटीने असलेल्या चाळींमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास तसेच आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास आपत्ती व्यवस्थापन पथकाला या परिसरात पोहचणे अशक्यप्राय असल्याचे चित्र आहे.

पाण्याची अनिश्चितता महिलांची डोकदुखी.

इंदिरानगर, रुपादेवी पाडा हा भाग अतिशय उंचावर असल्याने गेली अनेक वर्षे येथील नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठय़ाला तोंड द्यावे लागत आहेत. महापालिकेने येथे जलकुंभ बांधूनही येथील समस्यांचे निराकरण झालेले नाही. पाण्याची वेळ निश्चित नसल्याने बहुतांश महिला वर्ग हैराण आहे. त्यामुळे अनेक महिलांना घरात बसून राहण्याची वेळ आली आहे, तसेच बुधवारी पाणीकपातीमुळे येथील नागरिक नाराज आहेत.

महापालिकेची घंटागाडी सकाळच्या वेळी कचरा गोळा करून जाते. दुकानदार, भाजीवाले तसेच इतर व्यापारी कचराकुंडय़ांमध्ये दिवसातून चार-पाच वेळा कचरा टाकतात. त्यामुळे येथील कुंडय़ा कायम ओसंडून वाहत असतात. साहजिकच या भागात प्रचंड दरुगधी आणि रोगराईला आमंत्रण दिले जाते.      -धोंडू नारकर

संपूर्ण वागळे इस्टेट भागात अनिश्चित वेळेत आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठीही स्थानिकांना झगडावे लागत आहे. यावर स्थानिक प्रशासन कोणतीही ठाम उपायोजना करत नाही, त्यामुळे अस्वस्थता निर्माण होत आहे.

– छाया रणशूर

येथील पदपथांवर दुकानदारांनी सामान मांडल्याने चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिले नाहीत. पदपथांच्या खाली फेरीवाल्यांच्या हातगाडय़ांच्या रागां. त्यामुळे पादचाऱ्यांना धावत्या वाहनांशी झुंज देत रस्त्यावरून चालावे लागते.

ज्योती वाटपाडे

[jwplayer Vpu2EWaG]