भिवंडी-खारबाव-पायबाव-माणकोली मार्गावर चाचपणी
वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मार्गावर मेट्रो प्रकल्पाची त्वरित अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने भिवंडी ते कल्याण मार्गावर असाच प्रकल्प सुरू करता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे. भिवंडी परिसराचे मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण होत असताना या भागातून मुंबई, ठाण्याच्या दिशेने जाण्याकरिता या भागातील प्रवाशांना कल्याणच्या दिशेने येऊन छत्रपती शिवाजी टर्मिनसचा मार्ग धरावा लागतो. हे लक्षात घेऊन भिवंडी-खारबाव-पायबाव-माणकोली पट्टय़ासाठी मेट्रो मार्गाची चाचपणी केली जात आहे.भिवंडी ते ठाणे मार्गावर वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यापूर्वी मोनोरेल प्रकल्पाची आखणी केली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराने यासंबंधीचा सविस्तर आराखडा सादर केला असून, हा मार्ग आर्थिकदृष्टय़ा सोयीस्कर नसल्याचे महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत बनले आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण मार्गावर मोनोरेलऐवजी स्थानिक परिवहन प्राधिकरणामार्फत वाढीव बसफेऱ्या सुरू कराव्यात, असा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे. एकीकडे मोनोमार्गाची आशा धुसर दिसत असताना भिवंडी ते कल्याण या मार्गावर सुमारे २३.१० किलोमीटर अंतराचा मेट्रो प्रकल्प उभा करता येईल का, याची चाचपणी प्राधिकरणाने सुरू केली आहे.संयुक्त मेट्रो मार्गाच्या सुधारित प्रकल्प आराखडय़ात भिवंडी-कल्याण या मार्गाचा समावेश करण्यात आला असला, तरी त्याची त्वरित अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मात्र यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.दिल्ली मेट्रो महामंडळाने पहिल्या टप्प्यात मुंबई परिसरात तब्बल नऊ मार्गावर एकूण १४६.५० किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाची आखणी केली होती.’यासंबंधीच्या सविस्तर आराखडय़ास मान्यता दिल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रात अशाचप्रकारे मार्गाची आखणी करण्याचा मुद्दा पुढे आला. त्यानंतर वडाळा ते ठाणे-कासारवडवली अशा मेट्रो मार्गावर सध्या शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या सुधारित मेट्रो रेल्वेमार्गाची लांबी १७२ किलोमीटर एवढी असून, यामध्ये भिवंडी ते कल्याण या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे.