16 July 2019

News Flash

कल्याणमधील गणेश घाट परिसराची स्वच्छता

शहरातील काही संस्थांनी पर्यावरण वाचविण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविल्याचे पाहायला मिळाले.

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर बदलापूरच्या संस्थेची स्वच्छता मोहीम
गणेशोत्सवात एकीकडे शहरातील जलस्रोतांची होणारी दुर्दशा आणि परिसराचे विद्रूपीकरणाचे चित्र सातत्याने पुढे येत असताना दुसरीकडे मात्र शहरातील काही संस्थांनी पर्यावरण वाचविण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविल्याचे पाहायला मिळाले. विसर्जन मिरवणुकीनंतर तलाव परिसरात झालेली घाण उपसण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांनी पुढाकार घेत मोठय़ा प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविल्याचे दिसून आले.
कल्याणातील गणेश घाट परिसर गणपती उत्सवादरम्यान आणि नंतरही स्वच्छ असावा या उद्देशातून वासुदेव वामन बापट (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथील प्रकाश ज्ञान चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत ‘सामूहिक श्रमदान’ हा आगळावेगळा उपक्रम २२ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर रोजी राबविण्यात आला. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर प्रकाश ज्ञान शक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी गणेश घाट परिसराची स्वच्छता केली. यामध्ये संस्थेच्या ४० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. सामूहिक श्रमदान उपक्रमांतर्गत सुमारे ६०० किलो कचरा गोळा करण्यात आला. हा कचरा गणेश घाट परिसरातील एका कोपऱ्यात जमा करण्यात आला आणि त्यानंतर महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेल्या ट्रकच्या साहाय्याने हा कचरा नेण्यात आला. संस्थेच्या या उपक्रमासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती, असे मंगेश पाखरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उपक्रमासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख विलास जोशी आणि स्वच्छता अधिकारी योगेश जगताप यांचे सहकार्य लाभले.

First Published on September 29, 2015 12:10 am

Web Title: kalyan ganesh ghat premises clean by badlapur social organization