आता शिक्षण, नोकरी व्यवसायासाठी अनेक मुले परदेशी जाऊ  लागली आहेत. मोठय़ा शिक्षणाच्या संधीचा लाभ घेऊ लागली आहेत. मात्र त्याचबरोबर आजही अनेकांना आपलं गाव सुटत नाही, ही वस्तुस्थिती असून उज्ज्वल भवितव्यासाठी समाजातील मुला-मुलींनी व्यापक दृष्टिकोन बाळगण्याची गरज असल्याचे मत आयपीएस अधिकारी व मुंबईच्या परिमंडळ १ चे उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले.
आगरी युवक संघटनेच्या वतीने बदलापुरातील अजय राजा हॉलमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान रवींद्र शिसवे यांनी भूषवले. याप्रसंगी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, आगरी युवक संघटनेचे शरद म्हात्रे, दुर्वास धुळे, तसेच आगरी समाजातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उस्थित होते.
या सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात रवींद्र शिसवे यांनी हे मत व्यक्त केले. मूळचे आगरी समाजाचे असलेले शिसवे पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी बाहेर पडले पाहिजे. तसे होत नसल्याने संधी उपलब्ध असूनही आगरी समाजातील अनेक तरुण-तरुणींना त्यांचा लाभ घेता येत नाही. समाजातील मुला-मुलींनी सर्व क्षेत्रांत प्रगती केली पाहिजे. आयपीएस, आयएएस वाढले पाहिजेत. मेहनत घेऊन अभ्यास केला तर ते सहज शक्य असल्याचे सांगून समाजाने मुला-मुलींना यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे शिसवे म्हणाले. समाजातील एकही गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगून त्यासाठी विद्यार्थ्यांना  समाजाकडून प्रोत्साहन मिळण्याची गरज असल्याचे मत व्यक्त  केले.