तीन दिवसांपासून वीज नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांचा मेणबत्तीखाली अभ्यास

दहावीच्या परीक्षा तोंडावर असताना अभ्यास करण्याकडे लक्ष देणाऱ्या दिव्यातील तरुणांना वीजपुरवठा खंडित झाल्याने मोठा फटका बसला आहे. दिव्यातील काही भागांमध्ये गेले तीन दिवसांपासून वीजपुरवठा होत नसल्याने परीक्षेच्या ऐन तोंडावर विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या खाली बसून अभ्यास करण्याची वेळ आली आहे. यामुळे आधीच परीक्षेचा ताण असताना वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका विद्यार्थी सहन करत आहेत. दिवा पश्चिमेतील विद्युतपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने हा त्रास निर्माण झाला आहे. विद्युत कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू असले, तरी गेले तीन दिवसांपासून वीज नसल्याचा फटका येथील विद्यार्थ्यांना बसला आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा गावामध्ये पायाभूत व्यवस्थांचा पुरता बोजवारा उडाला असून, त्याचा फटका येथील नागरिकांना वारंवार सहन करावा लागतो. पाणी आणि विजेसारख्या मूलभूत गरजांसाठीही दिव्यातील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो आहे. येथील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड असून त्याचा फटका येथील विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असून अनेक मुलांच्या घरचा वीजपुरवठा बंद असल्याने त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

दिवा पश्चिमेतील हनुमान मंदिर परिसरामध्ये शुभम वऱ्हाडकर राहत असून तो इयत्ता दहावीमध्ये शिकतो आहे, तर त्याची बहीण सनिला बारावीमध्ये शिकत आहे. या दोघांची सध्या परीक्षा सुरू असून त्यांच्याकडे गेले तीन दिवसांपासून वीज नसल्याचा फटका या भावंडांना बसतो आहे. दिवा शहरामध्ये असे शेकडो विद्यार्थी वीजपुरवठा नसल्याने अभ्यासापासून वंचित होत आहेत. या परिसरात राहणारे अनेक विद्यार्थी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे त्रस्त असून, त्यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात असंतोष व्यक्त केला आहे.

दिव्यातील हनुमाननगर परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. बिघाड झालेला ट्रान्सफॉर्मर असलेल्या भागामध्ये नवा ट्रान्सफॉर्मर नेण्यासाठी पुरेसा रस्ता नसल्याने त्याचा फटका येथील वीज ग्राहकांना बसत आहे.

– दिलीप हर्णे, अभियंता महावितरण

दिवा शहराला नेहमीच सापत्न वागणूक दिली असून वर्षभर वारंवार वीज जाण्याचे प्रमाण इथे मोठे आहे. त्यामुळे आभ्यासाचा नेहमीच बट्टय़ाबोळ उडाला आहे. त्यामुळे परीक्षेच्या काळात तरी विद्यार्थ्यांना सुरळीत वीजपुरवठा करा.

– शुभम वऱ्हाडकर, विद्यार्थी