मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारांवरील औषधे घेणे बहुधा अनेक जणांना परवडत नाही. या पाश्र्वभूमीवर अत्यल्प किमतीमध्ये दर्जेदार औषधांचा पुरवठा करण्यासाठी अखिल भारतीय केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने ‘क्युमॅप’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून शहरातील २५हून अधिक औषधांच्या दुकानांमध्ये अत्यल्प दराने औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मधुमेह, रक्तदाब व हृदयविकार या विकारांच्या रुग्णांना दर महिन्याला अडीच ते तीन हजार रुपये केवळ औषधांवर खर्च करावे लागतात. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक किंवा आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गातील रुग्णांना हा खर्च परवडत नसल्याने ते अशी औषधे घेण्याचे टाळतात.  अशा रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत औषध पुरवठा करण्यासाठी आता अखिल भारतीय केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने पुढाकार घेतला आहे. या संघटनेमार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘क्युमॅप’ उपक्रमांतर्गत शहरातील निवडक औषध दुकानांमध्ये रुग्णांना ७० टक्के सवलतीत औषधे उपलब्ध होतील. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखालीच या औषधांचे वितरण केले जाणार असल्याचे संघटनेचे प्रमुख सल्लागार विलास जोशी यांनी सांगितले. सध्या ठाणे शहरातील २५ औषध दुकानांच्या माध्यमातून ही औषधे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.