ऑगस्ट महिन्यामधल्या २३ तारखेची गोष्ट आहे. रविवार असल्याने बदलापूरजवळील वांगणीमधील बाजारपेठ सकाळपासूनच गजबजलेली होती. कुम्डसावरे गावात राहणारे ४८ वर्षीय सोमनाथ पारधी सकाळी आठ-साडेआठ वाजताच भाजी आणण्यासाठी म्हणून आपल्या दुचाकीवरून बाजारपेठेत आले होते. भाजी घेऊन निघत असताना अचानकच त्यांच्या डोक्यात कसला तरी आघात झाला आणि ते कोसळले. दिवसाउजेडी बाजारपेठेत नंग्या तलवारी घेऊन आलेल्या तीन-चार जणांनी सोमनाथ पारधी यांच्या डोक्यात तलवारीसारख्या धारधार शस्त्राने वार केले होते. वांगणी रेल्वे स्थानकाजवळील भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांची एव्हाना आरडाओरड व धावपळ सुरू झाली होती. कुणाला काहीच कळत नव्हते. प्रत्येक जण धावत होता. या गोंधळामुळे बाजारपेठेत काहीतरी गडबड झाली आहे, अशी शंका रेल्वे स्थानकाजवळील चौकीतील पोलीस हवालदार पी. एस. कदम यांना आली. कदम ताबोडतोब घटनास्थळी दाखल झाले व त्यांना बाजारपेठेत घडलेला प्रकार दिसला. त्यांनी तातडीने हालचाल करत शिताफीने तेथून पळून जाणाऱ्या दोन-तीन जणांना पकडले आणि तात्काळ कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांना फोनवरून कळवले. घडलेल्या घटनेचे गांभीर्य कळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक पोरेही दहाच मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले व पकडलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून या वेळी तीन तलवारीही ताब्यात घेतल्या. तोपर्यंत सोमनाथ पारधी यांचा मुलगा विजय पारधी घटनास्थळी दाखल झाला. त्याने इतरांच्या मदतीने रक्तबंबाळ सोमनाथ यांना उल्हासनगर येथील रुग्णालयात नेले. मात्र अतिरक्तस्रावामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
भर बाजारपेठेत एका व्यक्तीची हत्या झाली होती. तीन मारेकरी ताब्यात आले होते. पण हत्येचे कारण उलगडत नव्हते. साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या साथीने पोलीस उप-निरीक्षक एल.टी. भोई, साहाय्यक फौजदार संभाजी पाटील, साहाय्यक फौजदार नामदेव जाधव, पोलीस हवालदार पी. एस. कदम, पोलीस हवालदार आर.डी. सूर्यवंशी, पोलीस हवालदार रशीद तडवी, पोलीस हवालदार डी. ए. गोसावी, पोलीस हवालदार पी. जे. कादरे आदींच्या पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली. विजयने दिलेल्या फिर्यादीत आपला चुलत भाऊ संभाजी किसन पारधी याच्यावर संशय व्यक्त केला होता. घटनास्थळी पोलिसांनी पकडलेल्या रामदास पारधी, शाहरूख शेख, नितीन सफरे या मारेकऱ्यांच्या चौकशीतही संभाजीचे नाव समोर येत होते. मारेकऱ्यांपैकी रामदास हा संभाजीचा सख्खा भाऊ होता. त्यामुळे तपास स्पष्ट झाला. पोलिसांनी संभाजीला अटक करण्यासाठी त्याचे घर गाठले. पण तोपर्यंत तो पसार झाला होता. पाच दिवसांनी तो घरी परतल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संभाजीने हत्येची कबुलीही दिली. पण हत्येचे कारण ऐकताच पोलिसांनाही धक्का बसला.
संभाजीचे वडील व सोमनाथ पारधी यांचे सख्खे मोठे भाऊ किसन पारधी हे दोन वर्षांपूर्वी वारले होते. या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबात जमिनीचे वाद नेहमीच चालू असत. किसन पारधी यांच्या तीन मुलांना सोमनाथ पारधी जादूटोणा करत असल्याचा दाट संशय होता. सोमनाथ यांनी केलेल्या जादूटोण्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचे संभाजी व त्याच्या दोन भावांना वाटत होते. त्यामुळे या तिघांनी सूड उगवण्याचा कट आखला. त्यांच्या या कटात संभाजीचा चुलत भाऊ चेतन पारधी, मित्र शाहरूख शेख, नितीन सफरे, रमेश खाडे हेदेखील सामील झाले. हत्येच्या दहा दिवसांपूर्वीच हा कट आखण्यात आला. २३ ऑगस्टला तो अमलात आणण्यात आला. पोलीस हवालदार पी. एस. कदम यांच्या प्रसंगावधानाने तीन मारेकऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर संभाजी आणि रमेश खाडे यांना मागाहून अटक झाली. मात्र, कटातील दीपक पारधी व चेतन पारधी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाहीत. भाऊभावकीतून होणारे वाद आणि हिंसाचाराचे प्रसंग नवीन नाहीत. पण आपल्या वडिलांचा नैसर्गिक मृत्यू चुलत्याने केलेल्या जादूटोण्यामुळे झाल्याचे ठरवून त्याची हत्या घडवण्याचा हा प्रयत्न अंधश्रद्धेचा बळी असेच म्हणावे लागेल.