स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित डोंबिवलीचा भाग म्हणून शहरात राबविण्यात येत असलेल्या भविष्यवेध डोंबिवली (व्हिजन डोंबिवली) उपक्रमात शहराच्या विविध भागांतील सोसायटय़ांमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या नेपाळी गुरख्यांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डोंबिवलीत चाळीस ते पन्नास हजार मालमत्ता आहेत. काही लहान, मोठी गृहसंकुले रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी नेपाळी गुरख्यांची नियुक्ती करतात. अनेक नेपाळी गुरखे सोसायटीतील रहिवाशांच्या रक्षणाबरोबर, सोसायटीत झाडलोटीची कामे करतात. त्याच वेळी ते इमारतीवरील टाकीतून सोसायटीला पाणी सोडण्याचे काम करतात. अशी तिन्ही कामे करणाऱ्या नेपाळी गुरख्यांना स्वच्छ डोंबिवली उपक्रमात सहभागी करून घेतले तर त्यांचाही हातभार या उपक्रमाला लागेल. तसेच, सोसायटी परिसर स्वच्छ, सुंदर राहणार आहे. म्हणून या मंडळींनाही या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात आले आहे, असे व्हिजन डोंबिवली प्रकल्पाचे समन्वयक डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले.
तसेच, अनेक गुरखे सोसायटीतील कचरा गोळा करण्याचेही काम करतात. त्यांनी रहिवाशांकडून ओला, सुका दोन वेगळ्या डब्यांमध्ये जमा करून तो पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागी कधी, कसा टाकावा याची माहिती गुरख्यांना दिली तर सोसायटीतील ओला, सुका कचरा नियमितपणे उचलणे शक्य होणार आहे. या दोन विभक्त कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. गच्चीवर असलेल्या जलकुंभातील पाणी सोसायटीला सोडण्यासाठी गुरखा दररोज इमारतीच्या गच्चीवर जातो. त्या वेळी त्याला टाकीत साचलेला गाळ किंवा पडलेली घाण याची इत्थंभूत माहिती असते. दर तीन ते चार महिन्यांनी गुरख्यांनी इमारतीवरील टाकीत साचलेल्या गाळाची माहिती सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिली तर, नियमित पाण्याची टाकी साफ करणे शक्य होईल. सोसायटीतील रहिवाशांचे आरोग्य गुरख्याच्या हातात असते. हेही सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणणे, हाही गुरख्यांना या उपक्रमात सहभागी करण्यामागील उद्देश आहे, असे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले. सुरुवातीला २५ ते ३० नेपाळी गुरख्यांचा गट तयार करण्यात आला आहे. अधिकाधिक नेपाळी गुरख्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.