ठाणे : ठाणे लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला मिळाल्यानंतर गुरुवारी भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा सत्र सुरू केले होते. परंतु शुक्रवारी गणेश नाईक हे स्वत: नरेश म्हस्के यांचा अर्ज दाखल करण्यास उपस्थित होते. अर्ज दाखल करताना गणेश नाईक यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि चांगले काम करायचे ठरले असे गणेश नाईक म्हणाले.
शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजिनामे दिले आहेत. मिरा भाईंदरमध्येही भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. परंतु शुक्रवारी म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गणेश नाईक हे त्यांचे पुत्र संजीव नाईक आणि संदीप नाईक यांच्यासोबत उपस्थित होते. गणेश नाईक यांना नाराजीबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, एखाद्याने निवडणुकीसाठी ईच्छा व्यक्त करणे हा गुन्हा आहे का? परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनिवण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची आम्ही भूमिका घेतली आहे. मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी दाबून धराव्या लागतील आणि काम करावे लागेल. कार्यकर्त्यांमधील नाराजी हळूहळू कमी केली आहे. ती नाराजी लवकरच पूर्णपणे दूर होईल असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी को हराना मुश्कीलही नही…
हेही वाचा – नरेश म्हस्केच्या मिरवणुकीत दोन गटात हाणामारी
नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्हाला ४८ जागा प्रतिष्ठेच्या आहेत. ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी कार्यकर्ते पूर्ण करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागतील असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.