पालघर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे चिरंजीव शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अमित घोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावितांचा १८,९४८ मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर विधानसभेसाठी शनिवारी मतदान झाले होते. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत अमित घोडा यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. ही आघाडी अमित घोडा यांनी अखेरपर्यंत कायम राखत १८,९४८ मतांनी विजय प्राप्त केला. अमित घोडा यांना एकूण ६८,१८१ मतं पडली, तर काँग्रेसच्या पारड्यात ४८,१८१ मतं पडली.
पालघर पोटनिवडणुकीत ६२ टक्के मतदान
या जागेसाठी ६२ टक्के मतदान झाले होते. शिवसेना-भाजप युतीने कृष्णा घोडा यांच्या चिरंजीवांना तिकीट दिले होते. त्यामुळे सहानुभूतीच्या लाटेवर अमित घोडा यांचा विजय निश्चित मानला होता. तरीसुद्धा काँग्रेसने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना तिकीट देऊन ही लढत प्रतिष्ठेची केली होती.