|| भाग्यश्री प्रधान

फुले रंगमंदिरात नाटकांना बंदी, खासगी कार्यक्रम मात्र जोरात

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले नाटय़गृहातील भाडेतत्त्वावरील वातानुकूलन यंत्रणेचे कंत्राट संपत आल्याने हे नाटय़गृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर खुले करण्याआधीच सावित्रीबाई फुले नाटय़गृह बंद करण्यात आले असले, तरी नाटकाव्यतिरिक्त इतर कार्यक्रम मात्र सुरू आहेत. नाटय़गृह कोणत्याही कार्यक्रमासाठी दिले जाणार नाही, अशी भूमिका येथील व्यवस्थापनाने घेतली होती. तरीही नाटकांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांना लाल गालिचा अंथरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली शहरात सावित्रीबाई फुले तर कल्याण शहरात आचार्य अत्रे रंगमंदिर अशी दोन नाटय़गृहे आहेत. गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले आचार्य अत्रे रंगमंदिर १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृह बंद करण्याची वेळ व्यवस्थापनावर आली. वातानुकूलन यंत्र दुरुस्तीचे कारण देऊन आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या यंत्राच्या निविदेची मुदत संपल्याचे सांगून हे नाटय़गृह बंद करण्यात आले. त्यानंतरही जवळपास महिनाभर भाडेतत्त्वावरील वातानुकूलन यंत्र सुरूच होते.

नाटय़गृह बंद असल्याचे जाहीर नाटकांचे प्रयोग बंद आहेत. मात्र, विविध संस्थांचे कार्यक्रम उत्साहात पार सुरू आहेत. शुक्रवार, १२ ऑक्टोबरपासून दोन दिवस येथे एका चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येत होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नाटय़गृह बंद असल्याचे सांगून गेल्या महिनाभरात या नाटय़गृहात एकही प्रयोग व्यवस्थापनातर्फे लावण्यात आला नाही. त्यामुळे नाटय़गृह नाटकासाठी आहे की संस्थांच्या कार्यक्रमासाठी, असा प्रश्नदेखील प्रेक्षक व कलाकारांकडून उपस्थित केला जात आहे.

वातानुकूलन यंत्रणेची मुदत संपली

सावित्रीबाई फुले नाटय़गृहातील रंगमंचावरील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याने येथे प्रयोग करणे योग्य नसल्याचे व्यवस्थापनाचे मत अहे. या संदर्भात अनेक कलाकारांनी आवाज उठवला होता. महापालिकेची आर्थिक स्थिती आणि आचार्य अत्रे रंगमंदिराची दुरुस्ती यामुळे रंगमंचावर वर्षभरासाठी भाडेतत्त्वावर ११० टनांची दोन वातानुकूलन यंत्रे लावण्यात आली होती, त्यांची मुदत ७ सप्टेंबरला संपली.

वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीसाठीची निविदा मंजूर होईपर्यंत भाडेतत्त्वावरील वातानुकूलन यंत्रणेच्या कंत्राटदाराला विनंती करण्यात आली. कंत्राटदाराने ही विनंती मान्य केल्याने काही दिवस हे नाटय़गृह सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे ज्या संस्थांनी नाटक तसेच कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली त्यांना नाटय़गृह खुले करून देण्यात आले. आता मात्र निविदा मंजूर झाली असून लवकरच यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.   – प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, कल्याण-डोंबिवली महापालिका

डागडुजीसाठी नाटय़गृह बंद ठेवणार असल्याचे सांगून नाटकांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून हा व्यवस्थापनाचा दोष आहे. डागडुजी करायचीच असल्यास नाटय़गृह पूर्णत: बंद ठेवावे आणि डागडुजीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. नाटय़गृहाची डागडुजी सोमवार ते शुक्रवार या काळात करावी.  शनिवार, रविवार हे दिवस नाटय़कलाकृती सादर करण्यासाठी देणे गरजेचे आहे.  – राहुल भंडारी, निर्माते