ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात खासगीकरणाच्या माध्यमातून दहा कम्युनिटी शौचालये प्रायोगिक तत्त्वावर उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने एका बैठकीत घेतला असून त्याकरिता प्रशासनाकडून लवकरच सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या दहा शौचालयांपाठोपाठ ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांत अशा प्रकारची शौचालये उभारण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत.
ठाण्याचे महापौर संजय मोरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि ‘हॅबीटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजन सॅम्युअल यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि अशोककुमार रणखांब हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये ‘हॅबीटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ या खासगी संस्थेच्या माध्यमातून कम्युनिटी शौचालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.