समाजकार्याच्या नावाखाली गर्दी जमवून राजकीय दिखाऊपणा

 

उल्हासनगर +: करोनाचा प्रादुर्भाव कमीत कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीदरम्यान या ना त्या कारणाने रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पिटाळताना पोलिसांची दमछाक होत असतानाच, सामाजिक कार्याच्या नावाखाली गर्दी जमवून राजकीय दिखाऊपणा करणाऱ्या अतिउत्साही समाजसेवकांमुळेही पोलीस हैराण झाले आहेत. नागरिकांना मदत पुरवण्याचे उपक्रम राबवण्याच्या नावाखाली संचारबंदीचे नियम पायदळ तुडवणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पहिल्यांदा राज्य शासनाने आणि नंतर केंद्र शासनाने २१ दिवसांची संचारबंदी लागू केली. त्यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. मात्र संचारबंदीमुळे गोरगरीब जनता, मंदिराबाहेर बसणारे भिकारी, झोपडपट्टीत राहणारे आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. पैसे नसल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना मदत म्हणून शहरातील विविध सामाजिक संस्था आणि व्यक्ती मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांच्या माध्यमातून अशा लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे. मात्र अशा समाजसेवी संस्था, संघटना आणि व्यक्तींसोबत अनेक लोकप्रतिनिधी, अतिउत्साहीदि आणि स्वयंघोषित समाजसेवक घराबाहेर पडून मदतीच्या नावाखाली गर्दी जमवू लागले आहेत. अनेक ठिकाणी मदतीच्या नावाने थातुरमातूर वस्तूंचे वाटप केले जाते. मात्र, मोठी गर्दी गोळा केली जाते, असे निदर्शनास आले आहे. अनेक लोकप्रतिनिधी काहीतरी करायचे म्हणून उपक्रम राबवत समाज माध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करत असल्याचेही समोर आले आहे. अशा अतिउत्साही समाजसेवकांच्या उपक्रमामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढू लागली आहे. गर्दी होत असल्याने सामाजिक अंतर राखले जात नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे संचारबंदीचा हेतूही फोल ठरत आहे. अशा कार्यक्रमांवर जातीने लक्ष ठेवण्याची विनंती उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी परिंमडळ चारच्या पोलिस उपायुक्तांना केली होती. त्याची दखल घेत परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी अशा कार्यकत्र्य़ावर कारवाईचा इशारा दिला आहे.

सेवा करत असताना एक मीटरचे अंतर राखणे, गर्दी टाळणेही आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नियम डावलून समाजसेवा करताना दिसल्यास किंवा तसे आढळल्यास फेसबुक, व्हाट्अ‍ॅसप आणि इतर माध्यमांतून आलेल्या छायाचित्रांचा आधार घेत कारवाई करण्यात येईल असा दमही भरण्यात आला आहे. चमकोगिरी थांबवा, घरात बसा, तुम्ही जगातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेल्या शहरात आहात, असेही पोलिस उपायुक्तांनी या अतिउत्साही समाजसेवकांना सुनावले आहे.