खासगी विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना करोनाची झळ

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : देशव्यापी टाळेबंदीमुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद असून शाळा शुल्कमाफीकरिता पालकांकडून तगादा लावला जात असतानाच पालकांनी शुल्क भरले तरच पगार मिळेल, अशी दटावणी खासगी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. यामुळे करोनाच्या काळात पगाराविना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या या शिक्षकवर्गाच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडली आहे.

करोना विषाणूच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण व्यवहारचक्र  थांबले आहे. टाळेबंदीच्या काळात कोणाचेही वेतन कापले जाऊ  नये, असे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आले असले तरी औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांनी या निर्देशांना केराची टोपली दाखवली आहे.

शिक्षणक्षेत्रालाही करोनाचा फटका बसला असून त्याची सर्वाधिक झळ खासगी विनाअनुदानित शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना बसू लागली आहे. वसई-विरार शहरात ४०० खासगी विनाअनुदानित शाळा असून त्यामध्ये जवळपास साडेपाच ते सहा हजार शिक्षक विद्यादानाचे कार्य करतात. गेल्या दोन महिन्यांपासून यापैकी अनेक शिक्षकांना वेतन मिळाले नसल्यामुळे या शिक्षकांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

करोनामुळे व्यवहार थंडावल्यामुळे सरकारकडून काही दिलासा मिळावा यासाठी सामान्य जनतेकडून विविध प्रकारे प्रयत्न होत असताना शाळा शुल्क माफ करण्याची मागणी असंख्य पालकांकडून होत आहे. त्यानुसार शाळा शुल्काकरिता पालकांवर सक्ती न करण्याचे तसेच आगामी शैक्षणिक वर्षांत शुल्कवाढ न करण्याचे निर्देश सरकारकडून शाळांना देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पालकांनी शुल्क भरल्यासच शिक्षकांना पगार मिळेल, अशी भूमिका खासगी विनाअनुदानित शाळांच्या व्यवस्थापनांनी घेतल्यामुळे शिक्षकांची गोची झाली आहे.

खासगी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना नेहमीच दुर्लक्षित केले जाते. विद्यादानासोबतच अनेक अशैक्षणिक कामांचा भारदेखील या शिक्षकांना वाहणे भाग पडते. जनगणना, निवडणुका, आधार कार्ड, कुटुंब नियोजन, विविध शासकीय योजनांसाठीचे सर्वेक्षण या साऱ्यासाठी सरकारकडून सर्वप्रथम नेमणूक होते ती खासगी विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचीच. खासगी विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकाचा पगार हा अनुदानीत शाळेतील शिपायापेक्षाही कमी आहे. त्यामुळे अशा शिक्षकांच्या समस्यांकडे सहानुभूतीने पाहून करोनासारख्या संकटाच्या काळात या शिक्षकांना दिलासा देण्याची मागणी खासगी विनाअनुदानित शिक्षक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

करोना आपत्तीच्या काळात खासगी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अत्यंत कठीण परिस्थितीत जगत आहेत. शासनाने पालकांना दिलासा दिला असला तरी शिक्षकांकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अनेक शिक्षक सहाव्या वेतन आयोगानुसार पुरेसे वेतन घेत असताना, त्यांच्याइतकेच काम करणारे, शिक्षण क्षेत्राला तेवढेच योगदान देणारे खासगी विनाअनुदानित शाळांतील हजारो प्रशिक्षित शिक्षक विनावेतन किंवा अत्यल्प वेतनावर काम करत आहेत.

– बॅरी डाबरे, अध्यक्ष, खासगी विनाअनुदानित शिक्षक संघटना