नीलेश पानमंद

अभिलेखावरील छायाचित्रांशी पडताळणी करून त्वरित सूचना; महापालिका आणि पोलिसांची योजना

ठाणे महापालिका क्षेत्रात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हाजुरी भागातील अत्याधुनिक नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येत असून येत्या १५ ऑगस्टपासून तो कक्ष कार्यरत होणार आहे. या कक्षातील यंत्रणेत परराज्यातून किंवा राज्याच्या विविध भागांतून गुन्हे करून पळालेल्या गुन्हेगाराच्या छायाचित्रांची नोंद केली जाणार असून यामुळे संबंधित गुन्हेगार ठाण्यात प्रवेश करताच त्याला कॅमेऱ्यांच्या मदतीने पकडणे शक्य होणार आहे.

ठाणे शहरात प्रभाग सुधारणा निधीतून १२००, वायफाय योजनेतून १०० असे एकूण १३०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी महापालिका आणि अन्य निधीतून १०० कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत. याशिवाय, आणखी तीनशे ते चारशे कॅमेरे शहरात बसविले जाणार आहेत. या योजनेमुळे संपूर्ण शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

हे सर्व कॅमेरे हाजुरी भागात उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून कोटय़वधी रुपये खर्चून हा नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी डाटा सेंटरचीही निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात असून १५ ऑगस्टपासून हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जाणार आहे. या कक्षातील यंत्रणेत परराज्यातून किंवा राज्याच्या विविध भागांतून गुन्हे करून पळालेल्या गुन्हेगाराच्या छायाचित्रांची नोंद पोलिसांच्या मदतीने केली जाणार आहे. या नोंदीमुळे संबंधित गुन्हेगाराने शहरात प्रवेश केला तर कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण कक्षाला तात्काळ सूचना मिळणार आहे. याशिवाय, त्याने केस, दाढी वाढवलेली असेल किंवा वेशभूषा केली असेल तरीही नियंत्रण कक्षातील यंत्रणा कॅमेऱ्यातील छायाचित्राचे विश्लेषण करून त्या गुन्हेगाराला ओळखू शकेल. त्यामुळे गुन्हेगारांना आता पकडणे सहज शक्य होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नागरी सुविधांवरही लक्ष

हाजुरी येथे उभारण्यात येणाऱ्या या नियंत्रण कक्षाला महापालिकेच्या नागरी सुविधांशी संबंधित विभागांचीही जोडणी करण्यात येणार आहेत. पालिकेतर्फे एकूण ५० सुविधा पुरवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात २० सुविधा या कक्षाशी जोडण्यात येतील.  या सुविधांमध्ये बिघाड झाल्यास नियंत्रण कक्षाला त्याची माहिती उपलब्ध होईल व त्याद्वारे संबंधित विभागाला सूचना केल्या जातील.