24 November 2017

News Flash

कासवांच्या बचावासाठी विहिरींची स्वच्छता

एक्झॉटिक प्रजातीच्या कासवांना विहिरीमधील वास्तव्य कठीण असते.

किन्नरी जाधव, ठाणे | Updated: September 14, 2017 3:48 AM

ठाण्यातील पर्यावरणप्रेमी सरसावले

कळव्यातील विहिरीमधील प्रदूषित पाण्याच्या संसर्गामुळे सात कासवांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असताना शहरात मोठय़ा संख्येने असलेल्या इतर विहिरींमधील जलजीवांच्या संरक्षणासाठी आता पर्यावरणप्रेमी आणि संस्था सरसावल्या आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा यासारख्या शहरांमधील विहिरीमधील पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी तसेच या ठिकाणी प्रामुख्याने आढळणाऱ्या कासवांच्या संरक्षणासाठी वाईल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेने महापालिका आणि वन विभागाच्या माध्यमातून विशेष प्रकल्प हाती घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. विहिरीतील कासवांच्या संरक्षणासोबतच पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी संबंधित विषयाचा अभ्यास करणाऱ्या काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्याची संकल्पना यापूर्वी या संस्थेने साकारली आहे. हाच प्रयोग मोठय़ा स्तरावर राबविण्याचा संस्थेचा प्रस्ताव आहे.

कळव्यातील विहिरीमध्ये प्रदूषित पाण्यामुळे सात कासव मृत अवस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. विहिरीत मोठय़ा प्रमाणात साचलेल्या कचऱ्यामुळे या कासवांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण वाईल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेतर्फे नोंदवण्यात आले होते. काही नागरिक घरातील कासवांचा अडथळा होत असल्यास आजूबाजूच्या विहिरींमध्ये कासवांना सोडतात, असे संस्थेच्या स्वयंसेवकांच्या वारंवार निदर्शनास येत असते.

यापैकी एक्झॉटिक प्रजातीच्या कासवांना विहिरीमधील वास्तव्य कठीण असते. सिंगापुरी, मलेशियन कासव अशा एक्झॉटिक कासव प्रजातींचे विहिरींमध्ये असलेले वास्तव्य मूळ गावठी कासव प्रजातींसाठी देखील अडथळ्याचे ठरत असते, असे वाईल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या आदित्य पाटील यांनी सांगितले. अनेक वेळा काही नागरिक फिश टँकमधील मासे मोठे झाल्यावर विहिरीमध्ये आणून सोडतात. विशेष म्हणजे एलिगेटर ग्लार हा मासा नागरिक विहिरीमध्ये सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा मासा विहिरीतील इतर माशांसाठी अडथळा ठरत असल्याने विहिरीतील नैसर्गिक साखळी धोक्यात येत असल्याचे संस्थेचे निरीक्षण आहे. यासाठी शहरातील विहिरींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात गावठी कासव आणि एक्झॉटिक प्रजातींचे कासव यांना विलग करून या कासवांना मोठय़ा तलावांमध्ये सोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

फ्लॅट टर्टल आणि सॉफ्ट टर्टल असे दोन प्रकारचे कासव विहिरींमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळत असतात. मात्र या कासवांना विहिरीच्या पाण्यात ठेवणे योग्य नसल्याने या प्रजातीच्या कासवांना मोठय़ा पाण्यात सोडण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

विहिरींमधील पाणी शुद्ध करण्याची मागणी

दीड वर्षांपूर्वी पाण्याचा तुटवडा भासताच पालिकेने मोठय़ा प्रमाणावर विहिरींचे तसेच नैसर्गिक जलस्रोतांचे शुद्धीकरण हाती घेतले होते. असे असले तरी आजही मोठय़ा प्रमाणावर विहिरी आणि तलावांचे पाणी प्रदूषित असल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन कासवांच्या संरक्षणासाठी विहिरीतील पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय संस्थेतर्फे घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित विषयाचा अभ्यास करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणार असल्याचे संस्थेचे आदित्य पाटील यांनी सांगितले. हा प्रकल्प पालिका, वन विभाग आणि महाविद्यालयाच्या एकत्रित कृतीतून यशस्वी होण्यासाठी प्रकल्पाची सविस्तर योजना तयार केली जात असून आयुक्तांकडे सादर केली जाणार आहे.

First Published on September 14, 2017 12:19 am

Web Title: tortoise issue cleanliness of wells