18 November 2017

News Flash

रिक्षामध्ये पाणी, वृत्तपत्रे आणि प्रथमोपचार पेटी!

रिक्षात प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाइल चार्जर, कचरापेटी, वृत्तपत्रे, पाणी, फुलझाडे ठेवली आहेत.

प्रतिनिधी, ठाणे | Updated: September 12, 2017 1:58 AM

रिक्षात मोबाइल चार्जर, पाण्याची सोय आहे. (छाया : गणेश जाधव)

ठाण्यात प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव

उर्मट, उद्धट आणि सदैव प्रवाशांशी हुज्जत घालणारा अशी समाजमानसात रूढ प्रतिमा असणाऱ्या रिक्षाचालकांमध्येही या अपप्रवृत्तीला अपवाद असणारे सज्जनमार्गी आहेत. ठाण्यातील संजय जगन्नाथ वरणकर हे त्यांपैकी एक. प्रवाशांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या संजय वरणकर यांनी रिक्षात प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाइल चार्जर, कचरापेटी, वृत्तपत्रे, पाणी, फुलझाडे ठेवली आहेत. तसेच रिक्षात निरनिराळी प्रबोधनात्मक घोषवाक्ये लिहिली आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्षात बसलेल्या प्रवाशांना सुखद धक्का बसतो.

संजय वरणकर हे कोपरी कॉलनी येथील पाटीलवाडी परिसरात राहतात. रिक्षात अनेकदा प्रवाशांना तहान लागते. संजय वरणकर यांच्या मुलांनी सायली आणि श्रेयसने रिक्षात प्रवाशांसाठी पाणी ठेवण्याची कल्पना मांडली. मुलांची ती कल्पना संजय यांनाही आवडली. रिक्षात पाण्याची बाटली पाहून प्रवासीही खूश होऊ लागले. त्यानंतर रिक्षातील मागच्या भागात त्यांनी कचऱ्याचा छोटा डबा ठेवला. त्यानंतर वर्तमानपत्र, मोबाइल चार्जर, प्रसन्न वातावरणासाठी मोगऱ्याचे छोटे रोपटे, चॉकलेटस्, प्रथमोपचार पेटी अशा काही गोष्टी त्यांनी रिक्षात ठेवल्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली.  याशिवाय रिक्षात ते व्यसनमुक्तीचा संदेश देतात. ते संदेश वाचून रिक्षातील सिगरेट पिणारा प्रवासी ती टाकून देतो, असे संजय वरणकर सांगतात. विशेष म्हणजे रिक्षात प्रवाशांसाठी छोटी अभिप्राय वही आणि पेनही ठेवण्यात आले आहे. ज्या प्रवाशाला त्यावर काही अभिप्राय किंवा सूचना करायची आहे, ते त्यावर लिहू शकतात. रिक्षात अनेक प्रवासी बसतात. दररोज संध्याकाळी घरी परतलो की मी अभिप्राय वही वाचतो आणि त्यानुसार सुधारणा करतो, असे संजय वरणकर यांनी सांगितले.

First Published on September 12, 2017 1:58 am

Web Title: water newspapers and first aid kit in auto rickshaw
टॅग Auto Rickshaw