आयुष्य एवढे आव्हानात्मक आहे हे माहिती असते तर, आयुष्या तुझ्या तावडीत सापडलोच नसतो, पण विधात्याने पकडून मला तुझ्या तावडीत सोडले आहे. पिंडावरून कोण कोठे जातो हे ठरवू नये, प्रत्येकाला आपल्या ध्येयानुसार आकाश मोकळे असते, प्रेमाचे विविध आविष्कार, घटस्फोटांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे बदलत चाललेली जीवनशैली, असे समाज जीवनातील विविध पदर आपल्या गझलांमधून उलगडून नव तरुण, हौशी गझलकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

‘शब्दांकित’ या संस्थेने निर्मिती केलेला ‘गझल तुझी नि माझी’ हा गझल गायनाचा कार्यक्रम शुभमंगल कार्यालयात आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे निवेदक व गझलकार प्रशांत वैद्य यांनी रसिक आणि गझलकार यांच्यामधील दुवा म्हणून काम केले. आजची स्त्री सक्षम, कणखर आणि रोखठोक आहे. आता ती तुझ्या माघारी धावणारी नाही, हे शर्वरी मुनीश्वर यांनी ‘घे जरा बदलून धर्मा तू तुझी वृत्ती जुगारी, लागण्या आता पणाला द्रौपदी लाचार नाही’ या गझलेतून सादर केले.  दत्तप्रसाद रानडे यांनी ‘जगाशी वेगळे नाते मलाही पाळता येते, हवे तर राखता येते, हवे तर टाळता येते’ या गझेलतून सांगितले.