‘लोकसत्ता’च्या बातमीनंतर शहरातील रस्त्यांवर काळ्या-पांढऱ्या पट्टय़ा
कल्याण शहरातून गेल्या अनेक वर्षांपासून हद्दपार झालेले झेब्रा कॉसिंग पहिल्यांदाच शहरात पुन्हा अवतरले आहे. कल्याण महापालिका मुख्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखण्यास सुरुवात झाली असून कल्याणातील पादचाऱ्यांसाठी हा एकप्रकारचा सुखद धक्का मानला जात आहे. कल्याणात पादचाऱ्यांना सोयीचे ठरेल असे झेब्रा क्रॉसिंग कुठेही अस्तित्वात नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ने पहिल्यांदा दिले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या आग्रा रस्त्यावर पहिल्यांदाच झेब्रा कॉसिंगचे पट्टे आखण्यात आले. त्याबरोबरच कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मुरबाड रस्त्यावरही अशाच प्रकारे झेब्रा कॉसिंगची आखणी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कल्याण-डोंबिवली शहरामध्ये वाहतुकीसाठी आवश्यक असणारी झेब्रा कॉसिंगसारखी अत्यंत महत्त्वाची व्यवस्थाच अस्तित्वात नव्हती. सिग्नल यंत्रणा नसलेल्या या शहरात अत्यंत मूलभूत असलेल्या झेब्रा कॉसिंगची आखणी नसल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. शहरात मोठे रस्ते अस्तित्वात येत असतानाही या झेब्रा क्रॉसिंगसारख्या गोष्टीची आठवण प्रशासनाला येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. या विषयावर ९ फेब्रुवारीच्या ‘लोकसत्ता ठाणे’च्या पहिल्या पानावर ‘झेब्रा क्रॉसिंगअभावी ससेहोलपट’ ही बातमी प्रसिद्ध करून तेथील पादचाऱ्यांची दयनीय अवस्था मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने शिवाजी चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखून पादचाऱ्यांची पहिल्यांदाच सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले आहे. याशिवाय शहरातील अन्य चौकांमध्ये अशी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पाठपुरावा करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

Untitled-35