२३ मृतदेहांची अद्याप ओळख पटली नाही

विरार : वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू वर्षांतील सहा महिन्यांत ११७ अपघात झाले असून त्यात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २३ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा या दरम्यानच्या ८ रेल्वे स्थानकांचा समावेश होते. जानेवारी ते जून २०२० या सहा महिन्यांत या मार्गावर एकूण ११७ रेल्वे अपघात झाले आहेत. त्यात ६४ जणांचा मृत्यू झाला तर ५३ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील २३ मयत प्रवाशांचा पत्ता अजूनही लागला नाही. टाळेबंदीत केवळ लांब पल्ल्याच्या विशेष गाडय़ा आणि ठरावीक उपनगरीय लोकल सेवा सुरू आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी असले तरी टाळेबंदीच्या काळातही ९ जणांचे अपघाती मृत्यू झाले. त्यांच्या वारसांचाही तपास लागलेला नाही.

मागील काही वर्षांत रेल्वे अपघातात दागावणाऱ्या प्रवाशांचा आकडा वाढला आहे. त्याच्या बरोबर त्यात बेवारस मृत्तांची संख्या वाढत असल्याने तसेच त्यांच्या वारसांचा शोध घेण्याचे आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे आव्हान वाढले आहे. एखाद्या व्यक्तीचा रेल्वे प्रवासात मृत्यू झाल्यास रेल्वे पोलीस १२ दिवस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतात. या १२ दिवसांत वारसांचा शोध न लागल्यास आणखी ४ ते ५ दिवस वाट पाहिली जाते. त्यानंतरही वारसांचा शोध न लागल्यास सरकारी खर्चाने विधीपद्धतीने मृतावर अंत्यसंस्कार केले जातात. अपघातातील मृत्तदेहाचे अंत्यविधी उरकल्यानंतर एखादा वारस पोलीस ठाण्यापर्यंत आला तर त्याला कागदपत्रे दिली जातात, अशी माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली.