ठाणे: घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागातील ठाणे महापालिकेच्या शाळेत इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्याचा १५ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी याच शाळेतील १२ वर्षीय विद्यार्थ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआरपीसी कलम १५६ (३) अन्वये  मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चितळसर मानपाडा भागात ठाणे महापालिकेची शाळा आहे. या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या १० वर्षीय मुलाचा ११ जानेवारी २०२३ मध्ये खेळाच्या तासिके दरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून कापूरबावडी पोलीस ठाण्यात करण्यात आला होता. त्याचा मृत्यू अपस्माराने झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात होते. परंतु त्याचा मृत्यू शाळेतील एका विद्यार्थ्याच्या मारहाणीत झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. त्यांनी याबाबत ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सीआरपीसी कलम १५६ (३) अन्वये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, मुलाच्या आईने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शाळेतील १२ वर्षीय मुलाने त्यांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school amy
First published on: 12-04-2024 at 01:04 IST