डोंबिवली – घरात आमच्या पूजा आहे. तुला चाॅकलेट देतो, असे सांगून एका ४२ वर्षाच्या इसमाने एका १० वर्षाच्या मुलीला आपल्या घरात बोलावून घेतले. तिला काही कळण्याच्या आत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलीच्या तक्रारीवरून कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने संबंधित इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी हा प्रकार घडला आहे.

कल्याण पूर्वेतील मलंगगड मार्गावरील एका सोसायटीत गुरुवारी हा प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह एका सोसायटीत राहते. ती इयत्ता चौथीत एका इंग्रजी शाळेत शिक्षण घेते. आरोपी इसम हा सोसायटीच्या पहिल्या माळ्यावर राहतो. गुरूवारी शाळेला सुट्टी असल्याने पीडित मुलगी आपल्या बहिणी आणि मैत्रिंणीसोबत सोसायटी आवारात दुपारच्या वेळेत खेळत होती. आरोपीने खेळणाऱ्या मुलींना आमच्या घरात पूजा आहे. तुम्ही देवदर्शनासाठी या. मी तुम्हाला चाॅकलेट देतो, असे सांगितले.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिना तोडल्याने प्रवाशांची फरफट

आमंत्रणाप्रमाणे मुली आरोपीच्या घरी दर्शनासाठी गेल्या. प्रसाद घेतल्यानंतर सर्व मुली निघून गेल्या. आरोपीने पीडित मुलीला चाॅकलेट देण्याचे आमिष दाखवून थांबवून ठेवले. तिला जबरदस्तीने घरातील शय्यागृहात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कुठे सांगितला तर तिला मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने पीडित मुलगी घाबरली.

हेही वाचा – ठाण्यात येऊन आदित्य ठाकरे गेले आव्हाडांच्या भेटीला, पण…

घडलेल्या प्रकाराने पीडितीने इसमाच्या तावडीतून सुटका करून घेतली. ती रडत घरी आली. घडला प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला. त्यांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. संबंधित इसमा विरुद्ध तक्रार केली. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती दिली. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.