ठाणे : भिवंडी येथील कसाईवाडा भागात गुजरात पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक शुक्रवारी जमील कुरेशी या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले असता पळून जाण्याच्या प्रयत्नात जमीलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जमावाने पोलिसांना मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमील कुरेशी याच्याविरोधात भिवंडीत २००६ साली झालेल्या दंगलीसह ११ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुजरातमधील वलसाड भागातील एका गुन्ह्याप्रकरणी जमील कुरेशीला ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी भिवंडीतील कसाईवाडा परिसरात आले होते. त्यांच्या मदतीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटचे दोन पोलीस कर्मचारीही होते. दरम्यान, शुक्रवारी पोलिसांचे पथक जमीलच्या चौथ्या मजल्यावरील घरात शिरले असता जमीलने घराच्या खिडकीतून खाली उडी मारली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर इमारतीखाली उभ्या असलेल्या जमावाने पोलिसांच्या पथकावर हल्ला करून पोलिसांना मारहाण सुरू  केली.