लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : रणरणते ऊन, घामाच्या धारांनी हैराण झालेले असताना भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे कार्यकर्ते कल्याण मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी उपस्थित झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये महिला, पुरूषांचा सर्वाधिक सहभाग आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे गर्दी असुनही कोठेही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
मोदी यांच्या सभेसाठी सुमारे एक लाख खुर्च्या सभा मंडपात लावण्यात आल्या आहेत. या सर्व खुर्च्या केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे भरणार नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागातील सामान्य महिला, पुरूष नागरिकांना ‘बांधिव’ कार्यकर्ते म्हणून विशेष बस उपलब्ध करून सभास्थळी आणले आहे. या नागरिकांच्या गळ्यात भाजप, शिवसेनेचे झेंडे, गमछे दिसून येत आहेत.
आणखी वाचा-कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा फलक
मोदी यांची सभा दुपारी दोन वाजता असल्याचा निरोप असल्याने सकाळी १० वाजल्यापासून शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहरी भागात कार्यकर्त्यांनी गावच्या नाक्यावर जमा होण्यास सांगितले होते. ही सभा संध्याकाळी पाच वाजता असल्याचे समजल्यावर मात्र कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. रणरणत्या उन्हात प्रवास करून आलेल्या कार्यकर्त्यांना आच्छादित सभा मंडपामुळे दिलासा मिळत आहे. मंडपात सर्वत्र पंखे, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही अशा पध्दतीने पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या जात आहेत.
उत्साही कार्यकर्ते सभा मंडपात मोदी, भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपील पाटील, कल्याणचे लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत आहेत. काही कार्यकर्ते वाजतगाजत सभास्थळी येत आहेत. भगव्या झेंडे, फलकांमुळे सभा स्थळ परिसर भगवा झाला आहे. सभा मंडपात जाण्यासाठी अतिअति महत्वाच्या व्यक्ति, अति महत्वाच्या व्यक्ति, कार्यकर्ते यांच्यासाठी तीन प्रवेशव्दारे आहेत. कल्याण शहर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. जागोजागी पोलीस जथ्थ्याने उभे आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. सुरक्षेचा त्रास नको म्हणून कल्याणमधील बहुतांशी रिक्षा चालकांनी घरी जाणे पसंत केले आहे.
पंतप्रधान मोदी येणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा रस्तारोधक आणि या भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहेत. पक्की दुकाने, बांधकामे यांच्यावर हिरव्या जाळ्या लावून ती बंदिस्त करण्यात आली आहेत. मोदींच्या मार्गाच्या दुतर्फा एकही माणूस फिरकणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष सुरक्षा पथकाचा सभा मंंडपाच्या बाहेर चार ते पाच स्तरीय वेढा आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयेाने वितरित केलेल्या प्रवेश पासाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तिला अति महत्वाच्या बैठक व्यवस्थेत प्रवेश दिला जात नाही. सभा मंडपाचा परिसराचा ५०० मीटरचा परिसर, रस्ते बांबूचे अडथळे, रस्ता रोधक लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सभा स्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अर्ध्या वाटेत रिक्षा, वाहन सोडून मग घरी पायी यावे लागत आहे.
आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने कल्याण शहर अघोषित बंद
भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सभास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत महायुतीच्या खासदारांनी विकास कामे, नागरिकांच्या मनातील कामे करून दाखवली असती तर अशाप्रकारे मोदींच्या सभेच्या आयोजनासाठी धडपड करावी लागली नसती, असाही सूर सभा ठिकाणी आलेल्या काही कार्यकर्त्यांकडून काढला जात आहे.
सेल्फी पॉईंट गर्दी
सभा मंडपाच्या बाजूला राम मंदिराची प्रतिकृती, तसेच पंतप्रधान मोदी यांची उभी प्रतिमा लावण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी जाऊन कार्यकर्ते राम मंदिराच्या प्रतिकृती सोबत, आणि मोदी यांच्या प्रतिमेसोबत स्वतःचे मोबाईल मधून छायाचित्र काढून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.