गणपतीच्या सुटीमुळे जीवितहानी टळली
अंबरनाथच्या पश्चिम भागातील मोरविली गाव भागात असलेल्या नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वर्गाचा काही भाग शनिवारी सकाळच्या सुमारास कोसळला. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही घटना घडली असून सुदैवाने शाळेला गणेशोत्सवाची सुटी असल्याने जीवितहानी टळली. मात्र, अशा प्रकारची घटना पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ असल्याची टीका होत आहे.
मागील काही वर्षांपासून या शाळेच्या इमारतीची अवस्था अतिशय जीर्ण झाली होती. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थी संघटनांनी पाठपुरावा केला होता. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत याच इमारतीत प्राथमिक शाळा सुरू ठेवली होती. मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने या शाळेचा एक वर्ग शनिवारी कोसळला. या वेळी सुदैवाने शाळेचे वर्ग रिकामे असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर अंबरनाथ पालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून शहरातील पालिकेच्या शाळांची दुरवस्था दूर करण्यात नगरपालिकेस अपयश आल्याची चर्चा रंगली आहे. शाळेच्या शेजारी असलेल्या नाल्यातील पाणी या वर्गात शिरल्याने हा वर्ग कोसळल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.