तिरका डोळा : पत्रास कारण की..

संदर्भणीय विषय तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे आता नमनालाच घडाभर तेल न जाळता किंवा ताकाला जाताना भांडे न लपविता थेट विषयालाच हात घालतो. पालिका निवडणुका तोंडावर

प्रति,
सन्माननीय पक्ष निरीक्षक आणि परीक्षक,
संदर्भणीय विषय तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे आता नमनालाच घडाभर तेल न जाळता किंवा ताकाला जाताना भांडे न लपविता थेट विषयालाच हात घालतो. पालिका निवडणुका तोंडावर आल्यात आणि पंचवार्षिक रिवाजाप्रमाणे यंदाही आम्ही किंवा आमच्या सौभाग्यवती पक्षाकडून पुन्हा तिकीट मिळविण्यास इच्छुक आहोत. आता आम्हीही स्वत:ला अनेकवचनी आदरार्थी म्हणवून घेऊ लागलो आहोत. नाही तर लोक नको तितकी सलगी दाखवितात. पूर्वी जेव्हा रिक्षा चालवायचो तेव्हा एरियात आम्हाला सर्व बाळू नावाने हाक मारत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दारात दोन चारचाकी गाडय़ा आहेत. त्यामुळे आम्ही स्वत:ला बाळासाहेब म्हणवून घेऊ लागलो आहोत. तुम्हीच एकदा भाषणात आपणच आपला आत्मसन्मान जपला पाहिजे, असे म्हणाला होतात ना. आम्ही फ्लेक्सद्वारे आमचा हा सेल्फ रिस्पेक्ट लोकांच्या गळी उतरविला. असो. तर पहिल्या टर्ममध्ये आम्हाला आणि नंतर आरक्षण पडल्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये सौभाग्यवतींना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. खरे तर होतो असेच आता म्हणावे लागेल. कारण गेल्या वर्षी काही महिन्यांच्या अंतराने झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही पक्षाने टाकलेली जबाबदारी निमूटपणे सोसून ते ऋण सव्याज फेडले आहे. अर्थात पक्षासाठी तितके करायलाच हवे. त्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. मात्र तिकीटवाटप करताना आमचे हे योगदान लक्षात घ्या म्हणजे झाले.
आताशा पक्षात नवे वारे वाहू लागले आहेत. नवीन, सुशिक्षित कार्यकर्ते निवडणूक लढू इच्छितात, असे कानावर आलेय. चांगले आहे. मात्र दिवसभर नोकरी-व्यवसायानिमित्त शहराबाहेर असणाऱ्या या सुशिक्षितांचा पक्षाला आणि प्रभागाला काय फायदा याचाही विचार करावा, असे मला नम्रपणे सुचवावेसे वाटते. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताहेत, असेही कानावर आलेय. अरे वा.. घराणेशाही म्हणे. गेली दहा वर्षे आम्ही सहकुटुंब प्रभागातील गल्लीबोळातील समस्यांचे निराकारण करीत फिरतोय. आता इच्छुक म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधलेले फक्त रात्री उशिरा किंवा एखाद्या रविवारी यायचे, फक्त कोरडे उपदेश आणि सूचना करायला. कारण ही सगळी नोकरदार मंडळी. सदा बिझी. मग काय आम्ही रिकामटेकडेच आहोत ना. २४x७ उपलब्ध. प्रभागाल्या बारशापासून मयतापर्यंत गेल्या दहा वर्षांत एकही प्रसंगी कधी चुकविला नाही. रहिवाशांच्या सुखदु:खात सहभागी झालो. रस्ते, पायवाटा, गटारे, नवे सार्वजनिक शौचालय सर्व कामे झाली. तरीही त्यांचे शेपूट वाकडेच. आता नगरसेवकाने आणखी काय करायचे? मला माहितेय माझ्या गाडय़ा दिसतात. चाळीतले घर सोडून मी फ्लॅटमध्ये राहायला गेलो. अहो, पण त्यात मी जगावेगळे काय केले? नोकरदार मंडळी घरे, गाडय़ा घेत नाहीत का? आता इतकी सेवा केल्यानंतर काही प्रमाणात आम्हीही मेवा खाणारच. त्याशिवाय आमचा प्रपंच कसा चालणार? का त्यासाठी पुन्हा पूर्वीसारखी रिक्षा चालवू?
गेली दहा वर्षे आपला पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे यंदा ‘अ‍ॅन्टी इनकबन्सी’ का काय म्हणतात तो परिणाम होण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे. सत्ता टिकवायची असेल तर विनिंग टीम बदलता कामा नये, असे मला वाटते. उलट यंदा आम्हा दोघांनाही तिकीट द्या, अशी आमची विनंती आहे. दोन्ही वॉर्ड जिंकून दाखवितो. शेवटचा चान्स द्या. पुन्हा तिकीट मागणार नाही. जोडय़ाने सभागृहात बसण्याची आमच्या सौभाग्यवतींची इच्छा आहे. तिचा हट्टच आहे समजा ना. आम्हाला फक्त तिकीट द्या. बाकी सर्व आम्ही पाहतो. पक्षाला काही करावे लागणार नाही. उलट हवे तर शेजारच्या तिसऱ्या वॉर्डाची जबाबदारीही घेतो.
कृपा करून गेल्या वेळेसारखे अर्ज भरायच्या आदल्या रात्री बारापर्यंत निर्णय लांबवू नका. धावपळ आणि पंचाईत होते.
– आपला विश्वासू,
कार्यसम्राट नगरसेवक
महादेव श्रीस्थानकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cause of the letter