Dombivli MIDC Blast Latest Update : डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडून ४५ तास उलटले आहेत. या घटनेत आत्तापर्यंत ११ मृत्यू झाले आहेत. तरीही घटनास्थळावर मानवी अवशेष सापडत आहेत. शोधकार्य करत असणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांना अनेक मानवी अवशेष सापडले आहेत. काही अवशेष ढिगाऱ्यांखाली तर काही आसपासच्या कंपन्यांमध्ये आढळून आले. यामुळे दिवसभर शोधकार्य सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढंच नाही तर रात्री दोनवेळा एका कंपनीत छोट्या प्रमाणात आग लागली होती ती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली ज्यामुळे पुढचा अनर्थ टळला. आता या ठिकाणी बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक पोहचले आहेत. त्यांच्या डोळ्यांत काळजी आणि मनात वेदना आहे जी चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे.

४५ तास उलटूनही शोधकार्य सुरु

४५ तास उलटून गेल्यानंतरही डोंबिवलीत स्फोट झाला त्या कंपनीच्या आवारात आणि आसपासच्या आवारात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत. कुणाचे हात, कुणाचे पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे दिवसभर शोधकार्य राबवण्यात येणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रकरणात ज्यांना अटक झाली आहे त्या आरोपींना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

१२ जणांची प्रकृती गंभीर

अमुदान कंपनीत जो स्फोट झाला त्यामुळे डोंबिवली शहर हादरलं आहे. घातक केमिकल तयार करणाऱ्या कंपन्यांचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्फोटात ६० हून जास्त लोक जखमी झाले होते. ज्यातील ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बार जणांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

हे पण वाचा- Dombivli MIDC Blast: कंपनी परिसरात आढळत आहेत मानवी मृतदेहांचे अवशेष, शोधकार्य आजही सुरुच राहणार

नातेवाईकांकडून आपल्या माणसांचा शोध सुरु

एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची टीम मागच्या दोन दिवसांपासून घटनास्थळी बचावकार्य करत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधून बाहेर काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. आज सकाळीही काही मानवी अवशेष सापडले आहेत. दुसरीकडे, या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे का याची खात्री नसल्याने कामगारांचे कुटुंब हताश झाले आहेत. रुग्णालयं, शासकीय हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल आणि पोस्टमार्टम रूममध्ये आपल्या नातेवाईकाची शोधाशोध करत आहेत. अद्यापही नातेवाईक सापडत नसल्यामुळे त्यांनी कंपनीच्या परिसरात जमा होऊन शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या मात्र पोलिस या कुटुंबियांना कंपनी परिसरातून थांबू देत नसल्याचं सांगितलं जातं आहे त्यामुळे काहीजणांनी संतापही व्यक्त केला आहे.

माझे जिजाजी काम करत होते, त्यांचा मृतदेह मिळत नाहीये. आम्हाला पोलीस हाकलून देत आहेत. आम्ही काय करायचं? मी शासकीय रुग्णालय, कंपन्या सगळं पाहिलं मात्र अद्यापही आम्हाला मृतदेह ताब्यात दिलेला नाही अशी खंत अंकित राजपूत याने बोलून दाखवली आहे.