scorecardresearch

घोडबंदरवासीय पाणीटंचाईमुळे हैराण; गेल्या दोन दिवसांत पाणी बंदमुळे नागरिकांवर पाण्याचे टँकर मागवण्याची वेळ

गेल्या दोन दिवसांपासून घोडबंदर भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोटय़वधी रुपयांची घरे असलेल्या या गृहसंकुलांना दररोज तीन ते चार खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते.

नीलेश पानमंद
ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून घोडबंदर भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोटय़वधी रुपयांची घरे असलेल्या या गृहसंकुलांना दररोज तीन ते चार खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते.
गेल्या दोन दिवसांत गृहसंकुलांना दहा टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एका टँकरसाठी ३५०० ते ४५०० रुपये मोजावे लागत असल्यामुळे गृहसंकुलातील नागरिकांवर आर्थिक भार पडत आहे.
ठाणे महापालिकेचे स्वत:च्या मालकीचे धरण नाही. पालिकेला चार स्त्रोतांकडून पाणी विकत घेऊन त्याचा शहरात पुरवठा करावा लागतो. महापालिका दररोज ४८५ दशलक्षलिटर इतका पाणीपुरवठा करते. त्यात महापालिकेची स्वत:ची योजना, एमआयडीसी, मुंबई महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाचा समावेश आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. त्या तुलनेत शहराला होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. यातूनच शहराच्या विविध भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे.
दिवा, कोपरी, लोकमान्यनगर, सावरकरनगर, मुंब्रा या भागात पाणीटंचाईविरोधात राजकीय पक्षांचे मोर्चे निघाले होते. घोडबंदर भागातील गृहसंकुलांमध्येही गेल्या दोन दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या जाणवू लागल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
खासगी टँकरचालक ३५०० ते ४५०० रुपये आकारतात तर महापालिका निवासी संकुलांसाठी १००० रुपये आणि व्यावसायिक संकुलांसाठी १५०० रुपये आकारते. संकुलांनी टँकरची व्यवस्था केल्यास महापालिकेकडून ७०० रुपये आकारले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
टँकरचा खर्च वाढला
ठाणे महापालिकेकडून घोडबंदर भागात दररोज ९० दशलक्षलिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या योजनेतून ७५ दशलक्ष लीटर तर स्टेम प्राधिकरणाकडून १५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. असे असले तरी गृहसंकुलातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे त्यांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते. या गृहसंकुलांना दररोज तीन ते चार खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते. गेल्या दोन दिवसांत पाणीटंचाईत वाढ झाल्याने त्यांना दहा टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. चांगल्या गुणवत्तेचे पाणी हवे असेल तर पाच ते सहा हजार रुपये एका टँकरसाठी मोजावे लागतात. यामुळे गृहसंकुलातील नागरिकांना मासिक देखभाल व दुरुस्ती खर्चाशिवाय अतिरिक्त पैसे भरावे लागतात. तसेच पुरेसे पाणी मिळत नसतानाही पालिकेला पाणी देयक भरावे लागत आहे, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.
जनहित याचिका
घोडबंदर भागातील रहिवासी वकील मंगेश शेलार यांनी २०१६ मध्ये पाणीटंचाई संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान घोडबंदर भागातील नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ५ ऑगस्ट २०१७ रोजी ठाणे महापालिकेला दिले होते. परंतु या याचिकेच्या अंतिम सुनावणीत हा आदेश काही अटींवर रद्द करण्यात आला होता. त्यात विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) आणि ठाणे जिल्हा सचिव लीगल सर्विसेस अॅलथोरिटी यांच्या समितीचे गठन करून ही समिती महिन्यातून दोन वेळेस बैठक घेऊन नागरिकांच्या घरगुती पाणीपुरवठय़ाबाबत तक्रारी ऐकून समस्येचे समाधान करेल, अशी प्रमुख अट होती. परंतु ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून कोणतीही समिती स्थापन केली नसल्यामुळे घोडबंदर भागात पाणी समस्या गंभीर बनत असल्याचा आरोप करत भाजपचे ठाणे शहर चिटणीस दत्ता घाडगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही जनआंदोलन उभारण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका म्हणते?
भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उपसा करण्यासाठी नवीन पंप बसविण्याचे तसेच टेमघर जलशुद्धिकरण केंद्रामध्ये जलमापक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी बुधवार, ११ मे रोजी सकाळी ९ ते गुरुवार, सकाळी ९ या कालावधीत महापालिकेच्या योजनेतून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या कामास विलंब झाल्याने तसेच पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर तो कमी दाबाने होत आहे. त्यामुळे घोडबंदर भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. महापालिकेने नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ghodbander suffer water scarcity time order water tankers citizens water last days amy

ताज्या बातम्या