तलासरीतील तरुणाला अटक
एका तरुणीचे अश्लील छायाचित्र व चित्रफीत काढून त्या आधारे ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला तलासरी पोलिसांनी अटक केली आहे.
पालघर तालुक्यातीेल तलासरी येथे २५ वर्षीय पीडित तरुणी राहते. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशीे शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्या वेळी त्या संबंधाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्या चित्रीकरणाच्या आधारे तो वारंवार तिला ब्लॅकमेल करून पैशांचीे मागणी करू लागला आणि वारंवार बलात्कार करू लागला. बदनामीपोटी ही तरुणी सगळे सहन करीत होती.
दरम्यान, या तरुणाचे अन्य एका मुलीसोबत लग्न झाले. यानंतर तरी आपली त्याच्या त्रासातून सुटका होईल, अशी अपेक्षा त्या मुलीला होती. पण पुन्हा आरोपी तरुण तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करू लागला. त्याला पीडित तरुणीने नकार दिल्याने आरोपीने तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत व्हॉट्सअ‍ॅपवरून तिच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना पाठवली. यानंतर मात्र तिचा संयम सुटला आणि तिने तलासरी पोलीस ठाण्यात धाव घेतलीे. तलासरी पोलिसांनी आरोपीवर बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान अधिकार कायदा कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.