उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत, अशी घोषणा करणारे, तसेच मिशन सुरक्षित उल्हास असे अभियान राबवणारे टीम ओमी कलानीचे कार्यकर्ते एकीकडे चांगले उपक्रम राबवीत असतानाच दुसरीकडे शहर विद्रुप करण्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या टीम ओमीचे कमलेश निकम यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली फलकबाजी बेकायदा असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर शहरात पक्षीय राजकारणात टाळून कलानी नावाच्या दबदब्याचा फायदा घेत ओमी कलानी यांनी शहरात टीम ओमी कलानीच्या नावाने राजकारणात पदार्पण केले. त्या माध्यमातून युवा वर्गाला आकर्षित करत विविध लोकप्रिय कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. नुकताच शहर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चौकात सीसीटीव्ही लावण्याचा कार्यक्रमही टीम ओमी कलानीच्या वतीने हाती घेण्यात आला. त्यामुळे शहरात ओमी कलानीच्या या उपRमांचे कौतुक होते आहे. मात्र त्याचवेळी शहर विद्रुपीकरणातही टीम ओमी कलानीचाच मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे.

ओमी कलानी यांचा विश्वासू आणि जवळचा मानला जाणारा कार्यकर्ता म्हणून कमलेश निकम परिचीत आहे. पप्पू कलानी याच्यापासून ओमी कलानीपर्यंत टिकलेला तो एकमेव कार्यकर्ताही असावा. या कमलेश निकम याचा वाढदिवस नुकताच पार पडला. त्यानिमित्त शहरभर जोरदार फलकबाजी करण्यात आली होती. मात्र ही फलकबाजी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता केल्याचे आता समोर आले आहे.

शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये लावलेले वाढदिवसाचे हे फलक बेकायदा पद्धतीने लावण्यात आले होते. याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात उल्हासनगर कॅम्प २ येथील अमरधाम चौक आणि संत ज्ञानेश्वरनगर प्रवेशद्वारावर लावलेल्या फलक लावणाऱ्या अज्ञातांविरूद्ध भगवान कुमावत या पालिका कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून उल्हासनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्तेचे विरूपणास प्रतिबंधक अधिनियम १९९५ च्या कलम तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.