ठाणे : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील तलावांच्या संवर्धनाचे कार्य ठाणे महापालिकेने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. गेल्याकाही दिवसांपासून ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील तलावाचे संवर्धन सरू आहे. या तलावात पक्ष्यांसाठी ‘बर्ल्ड लँड’ तयार करणे, तलावाची खोली वाढविणे, प्रदूषित पाणी काढणे अशी कामे केली जात आहेत. या तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर आणखी सहा ते सात तलावांचे संवर्धन केले जाणार आहे.

ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. तलाव संवर्धनासाठी तत्त्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या सूचनेनुसार तलाव संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रीन यात्रा या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून व्यवसायिक सामाजिक जबाबदारीतून (सीएसआर) निधीतून या तलावाचे संवर्धन केले जात आहे. पहिला प्रकल्प म्हणून ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील तलावाच्या निर्माणाचे कार्य संस्थेने हाती घेतले आहे. अनेकजण या तलावामध्ये निर्माल्य फेकत होते. तसेच कचरा देखील टाकला जात होता. तलावातील पाणी देखील दुषित झाले होते. त्यामुळे तलाव परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरत होती. या परिसरातून अनेक वाहने जात असतात. त्यामुळे वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागत होता. तलावात देखील मोठ्याप्रमाणात गाळ साचला होता. यामुळे तलावातील खोली कमी झाली होती. हा तलाव केवळ १० फूट खोल होता. प्रदूषित पाण्यामुळे जलचरांवर देखील त्याचा परिणाम होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

हेही वाचा : गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन

गेल्याकाही दिवसांपासून ग्रीन यात्रा या संस्थेने महापालिकेच्या मदतीने येथील तलावाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. या तलवातील सध्या गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जलचरांना धोका उद्भवू नये म्हणून तलावामध्ये दोन फूट चर तयार करून खड्डा करण्यात आला आहे. तलावातील जलचरांना या पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये ठेवण्यात आले आहे. या तलावातील खोली वाढविण्यासाठी तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. हा तलाव सुमारे २५ फूट खोल केले जाणार आहे. तसेच या तलावामध्ये पक्ष्यांसाठी एक छोटे ‘बर्ल्ड लँड’ तयार केले जाणार आहे. तलावातील पाणी शुद्ध ठेवण्यासाठी तरंगते पाणथळ (फ्लोटिंग वेटलँड) ठेवण्यात येणार आहे. या तलावाची देखभाल-दुरूस्ती दोन वर्ष ग्रीन यात्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानंतर हा तलाव ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केला जाईल असे ग्रीन यात्राचे प्रकल्प व्यवस्थापक भावेश जोगदिया यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

ग्रीन यात्रा ही स्वयंसेवी संस्था ‘सीएसआर’च्या माध्यमातून तलावाचे संवर्धन करत आहे. शहरातील इतर तलावांचेही संवर्धन केले जाणार आहे.

– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण विभाग, ठाणे महापालिका.